अंधेरी- गेल्या आठवड्यात मरोळ(Marol) येथे सृष्टी तुली या एअर इंडियामध्ये(Air India) पायलट असलेल्या २५ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. या प्रकरणी आदित्य राकेश पंडित (२७) याला मंगळवारी पवई पोलिसांनी आत्महत्येस(Suicide) प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. आदित्यला शुक्रवारी शहर न्यायालयाने(City court) सोमवारपर्यंत पोलीस कोठडी(Police custody) सुनावली.
पंडितच्या कोठडीत आणखी वाढ करण्याची मागणी करताना पवई पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयाला सांगितले की आरोपी तपासात सहकार्य करत नाही. त्याला सृष्टीच्या फोनचा पासवर्ड माहित होता मात्र त्यासंबंधी त्याने दोन दिवसाने पोलिसांना माहिती दिली.
पंडित आणि तुली यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे पोलिसांना समजले आहे, त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांना आदित्यच्या कोठडीची आवश्यकता आहे, असेही पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केले.
तथापि, बचाव पक्षाच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की आदित्य पंडितच्या कोठडीत वाढ करण्यासाठी पोलिसांकडे कोणतेही ठोस कारण नाही. आधीच पोलिसांकडे असलेल्या त्याच्या फोन आणि लॅपटॉपवरून बँक व्यवहारांचे तपशील मिळू शकतात. यासाठी त्याच्या व्यक्तिगत कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद त्याच्या वकिलाने केला.
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पंडितला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
गोरखपूरची रहिवासी असलेली सृष्टी तुली सोमवारी पहाटे अंधेरी (पूर्व) येथील मरोळ पोलिस कॅम्पच्या मागे भाड्याच्या घरात मृत आढळून आली. प्राथमिक चौकशीत आदित्य पंडितच्या छळामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती, असे पोलिसांनी सांगितले. आदित्य पंडित, जो फरीदाबाद-एनसीआरचा रहिवाशी आहे. तो पायलटच्या परीक्षेची तयारी करत होता. परंतु पात्र होण्यास तो अपयशी ठरला होता.
रविवारी सृष्टी तुली काम आटोपून घरी परतली असता तिचा आदित्य पंडित याच्याशी वाद झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पहाटे एकच्या सुमारास आदित्य पंडित एका कारने दिल्लीला निघाला. सृष्टीने त्याला फोनवर कॉल केला आणि सांगितले की ती टोकाचे पाऊल उचलणार आहे. आदित्यने तिच्या धमक्यांकडे लक्ष दिले नाही तेव्हा तिने त्याला व्हिडिओ कॉल केला आणि आपण कशी आत्महत्या करणार आहोत हे दाखवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य पंडित सृष्टीच्या घरी परतला पण त्याला दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्याने बनावट चावी तयार करणाऱ्या कारागिरास बोलावले, खोली उघडली. मात्र सृष्टीने डेटा केबलच्या साह्याने गळफास लावून घेतला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आदित्य पंडित यांनी तुलीला मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात नेले, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना कळवण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, दोघांमधील भांडणामुळे सृष्टीने टोकाचे पाऊल उचलले.
आदित्य काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आणून देताना, सूत्राने सांगितले की त्याने तुलीसोबतचे चॅट्स डिलीट केले आहेत.
सृष्टीला टोकाचे पाऊल उचलण्यापासून रोखण्यासाठी आदित्य तिच्या घरी परतत असताना तिच्या फोनवर सुमारे 10-11 फोन कॉल्स शिवाय अनेक मिस्ड कॉल्स आले होते, पोलिसांनी सांगितले. त्यांनी पंडितचा फोन ताब्यात घेतला आहे.
जेव्हा पोलिसांनी पंडितला त्यांच्या भांडणाचे कारण विचारले तेव्हा त्याने दावा केला की सृष्टी त्याला आणखी काही दिवस तेथे राहण्यास भाग पाडत होती परंतु त्याने तेथून जाण्याचा निर्णय घेतला. पोलिस त्यांच्या चॅट आणि मेसेजवरून याची पडताळणी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.