मुंबई: कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची चौकशी सुरू असतानाच, एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बेस्ट बस चालक ड्युटीवर असताना दारू खरेदी करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही घटना अंधेरी पश्चिम वर्सोवा भागात घडली असून ती व्हिडिओमध्ये कैद झाली आहे.
वर्सोव्याचे मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी एक्स (X) या समाज माध्यमावर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडिओ मध्ये गोराई बस आगार आणि अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान चालणारी A-259 क्रमांकाची वातानुकूलित बेस्ट बस लोटस वाईन्स नावाच्या दारूच्या दुकानासमोर थांबवली जाते. प्रवासी बस मध्ये असताना, चालक वाहनातून बाहेर पडून दारू खरेदी करतो बसमध्ये परतताना दिसतो.
देसाई यांनी या फुटेजची तुलना कुर्ला दुर्घटनेशी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या अशा बेपर्वा वर्तनावर बेस्ट प्रशासन काय उपाययोजना करणार असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
कुर्ल्यातील स.गो. बर्वे रोडवरील भीषण अपघातानंतर दोनच दिवसांनी हा व्हिडिओ समोर आला आहे. सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आणि अनेक 40 च्या वर नागरिक जखमी झाले.