विरार : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रम अंतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालय येथे १२ आणि १३ जानेवारी २०२५ रोजी यशस्वीरीत्या पार पडले. अधिवेशनाचे उद्घाटन बारामती ॲग्रो ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांच्या हस्ते झाले. उद्योजक प्रदीप लोखंडे, उपसचिव गौरव जोशी, उत्तम गायकवाड, ऍड. धनराज वंजारी आणि उपायुक्त राजीव नंदकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या अधिवेशनात पालघर जिल्ह्यामधील विरार येथील विवा महाविद्यालयाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. करिअर कट्टा पालघर शहर जिल्हा समन्वयक व महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, सहा. प्रा.ओमकारी पोतदार तसेच करिअर संसदचे ११ विद्यार्थी पदाधिकारी पंचासरा यश कांतिलाल, चिंतन राजेश केळसकर, अभिषेक एकनाथ बडवे, अमित दिलीप मिश्रा, क्रिश राकेश राजभर, शामबाला बबन पाटील, कांचन सुनील गुप्ता, पूर्वा दत्तू पाटील, सिध्दी दिपक गावडे, राजू व्यकंटप्पा कुकाली, स्वाती विनोद सिंग सहभागी झाले होते.
दोन दिवसीय अधिवेशनात मुक्त चर्चासत्रात डॉ. सोनाली लोहार यांनी आवाजाची काळजी कशी घ्यावी, यावर मार्गदर्शन केले, तर चित्रा उबाळे यांनी करिअर संधी आणि मुलाखतीसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांवर मत व्यक्त केले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी कृषी महाविद्यालयातील कृषी प्रदर्शनाला भेट दिली. माहिती व तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून आपण शेती कसे करू शकतो तसेच भविष्यात विविध उद्योग जसे की, कुक्कुट पालन, शेळी पालन, दुग्धव्यवसाय बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. अमेरिका येथील गर्जे मराठीचे संस्थापक आनंद गानु यांनी तेथील व्यवसायाबद्दल माहिती दिली. करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे आणि त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांसाठी मोफत उत्तम राहण्याची व जेवणाची सोय केली.
बारामतीत आयोजित केलेल्या या अधिवेशनामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी उद्योजकता आणि व्यावसायिकता निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करता आली त्याचबरोबर उज्वल भविष्य आणि करिअर साठी आवश्यक असलेल्या नवीन वाटा यांचे महत्त्व देखील कळाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर कट्टा अंतर्गत नियोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल ठरेल असे मत महाविद्यालयाचे उपप्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांनी व्यक्त केले.