मुंबई: अंधेरी रेल्वे स्टेशनवर प्रार्थना करत असलेल्या मुलीचा आणि तिला मार्गदर्शन करणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) कसून चौकशी केली. चौकशीअंती धर्मांतराचा प्रयत्न होत असल्याच्या सोशल मीडियावरील आरोपांचे रेल्वे पोलिसांनी खंडन केले आहे. पोलिसांनी सांगितले की, ती मुलगी आणि तो वृद्ध व्यक्ती एकमेकांना ओळखत होते. सदर चित्रफितीत ते एका जपानी ध्यान पद्धतीचा सराव करत होते.
एका प्रत्यक्षदर्शीने चित्रित केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये, एक गृहस्थ त्या वृद्ध व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी धार्मिक विधी न करण्याबद्दल ताकीद देत असल्याचे ऐकू येते. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून चौकशी केली.
“कोणत्याही प्रवाशाने आमच्याशी संपर्क साधला नाही किंवा त्या वृद्ध व्यक्तीविरुद्ध आमच्याकडे तक्रार दाखल केली नाही. आम्ही त्या मुलीचा शोध घेतला आणि तिच्याकडे चौकशी केली. तिच्या संमतीशिवाय प्रत्यक्षदर्शीने चित्रीकरण केल्यामुळे ती अस्वस्थ झाली होती,” असे जीआरपी अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोशल मीडियावरून व्हिडिओ क्लिप काढून टाकण्याची विनंती केली आहे.
