शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष यावर आधारित “द महाराष्ट्र फाईल” हा सामाजिक आशयाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समोर आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरने चित्रपटाची उत्सुकता वाढविली आहे . “द महाराष्ट्र फाईल” हा चित्रपट केवळ एका महिलेच्या संघर्षाची कथा नाही, तर तो संपूर्ण व्यवस्थेतील छुप्या कार्यपद्धतीचे वास्तव उघड करणारा आरसा आहे. सरकारी कर्मचारी आणि दलालांकडून जनतेची कशी दिशाभूल केली जाते, न्याय कसा लांबवला जातो आणि भ्रष्टाचार कसा बोकाळतो, हे या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
कागदाच्या ढिगाऱ्यांत लपलेलं सत्य जेव्हा बाहेर येतं, तेव्हा फक्त फाईल्स उघड्या नाहीत तर संपूर्ण व्यवस्था हादरते याचं चित्रण चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या २९ मे २०२६ पासून हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल.
निर्माते, दिग्दर्शक, लेखन, कथा, पटकथा अशी सर्व बाजूंनी चित्रपटाची धुरा संजीव कुमार राठोड यांनी सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि सह निर्माते म्हणून शालिनी राठोड यांनी बाजू सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून आर्यन राठोड याने बाजू पाहिली.
या चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे. येत्या २९ मे रोजी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.
