जोगेश्वरी- ३ मे रोजी सायंकाळी पवईतील महात्मा फुले नगरजवळ जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर (जेव्हीएलआर) भरधाव वेगाने जाणाऱ्या ह्युंदाई क्रेटा गाडीने तीन पादचाऱ्यांना धडक दिली. याप्रकरणी गाडी चालविणाऱ्या १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, गाडी भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या लोकांना धडक दिली. घटनेच्या वेळी गाडीत इतर दोन जण होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एक महिला अचानक गाडीसमोर आल्यानंतर चालकाने गाडी बाजूला वळवली. या घडामोडीत रस्ता ओलांडणाऱ्या तीन पादचाऱ्यांना धडक दिली. ही धडक देण्यापूर्वी त्याने एका मोटरसायकललाही धडक दिल्याचे म्हटले जाते.
आजूबाजूच्या लोकांच्या रोषाच्या भीतीने चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. नंतर त्याने विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील पोलीस चौकीत आत्मसमर्पण केले.
जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे म्हणाले, “कारचालक एक विद्यार्थी आहे. आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी चालकाने आपल्या कारने पादचाऱ्यांना धडक दिली. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही रक्ताची तपासणी केली असून, तो दारूच्या नशेत होता की नाही हे निश्चित करण्यासाठी अहवालाची प्रतीक्षा करत आहोत. एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.”
पोलिसांनी आरोपीची ओळख विशाल दीप सिंधू, रा. खारघर, नवी मुंबई अशी पटवली आहे.
प्राथमिक तपासणीत दारूचे सेवन केल्याचे आढळले नाही, तरीही अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पहिल्या धडकेत मनीषा सावंत (४५) रा. महात्मा फुले नगर या जखमी झाल्या त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुसऱ्या धडकेत जे जखमी झाले त्यामध्ये नाथा सोपान पारगावकर (४०), अम्माचार पांडे (४०), धनुष पांडे (१३) यांचा समावेश आहे. नाथा पारगावकर आणि धनुष पांडे यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर अम्माचार पांडे यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे मिड-डेच्या वृत्तात म्हटले आहे.
