अंधेरी: अंधेरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील आंबोली नाका परिसरात गुरुवारी दुपारी चार बसच्या साखळी धडकेत बेस्ट बसच्या एका वाहकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजकुमार शॉपजवळ घडलेल्या या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यावर मोठे झाड पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. त्याचदरम्यान तीन बेस्ट बस रस्त्यावर थांबलेल्या होत्या. अंधेरी पश्चिमकडून वर्सोवाकडे जाणाऱ्या मार्ग क्रमांक २५१ वरील पीएमआय इलेक्ट्रिक बसने मागून येत उभ्या वाहनांना जोरदार धडक दिली.
या धडकेदरम्यान मार्ग क्रमांक २६६/३२ वरील एका बसचा वाहक वाहनासमोरून जात असताना दोन बसच्या मध्ये अडकला. गंभीर जखमी झालेल्या वाहकाला तातडीने कूपर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनास्थळी भेट दिलेल्या बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी सांगितले की, “तिसऱ्या बसने पुढे जाण्याचा प्रयत्न करताना चुकीने वेग वाढवला आणि दुर्घटना घडली. नेमके काय झाले हे पाहण्यासाठी मागे गेलेल्या पहिल्या बसच्या वाहकाला धावत्या बसने धडक दिली.”
नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका बेस्ट अधिकाऱ्याने सांगितले की, वाहक रस्ता ओलांडत असताना बसखाली आला.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पीएमआय बस चालकाचे बससमोरून जाणाऱ्या वाहकाकडे लक्ष गेले नसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण आणि परिस्थितीची चौकशी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली असून सखोल तपास सुरू आहे, असे मिड डेच्या वृत्तात म्हटले आहे.
छायाचित्र सौजन्य: फ्री प्रेस जर्नल
