अंधेरी- ओशिवरा पोलिसांनी (Oshiwara Police station) विरार (Virar) येथून एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून १.२६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीने अंधेरी (Andheri) (पश्चिम) येथील लोखंडवाला(Lokhandwala) येथील एका बंगल्यातून १.३७ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरल्याचा आरोप आहे. सदर कुटुंब नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्याला गेले होते. आरोपीने शहरात अनेक गुन्हे केल्याचे चौकशीदरम्यान पोलिसांना समजले. १० पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कृष्णाकुमारी सिंग (८२) या अंधेरी (पश्चिम) येथील लोखंडवाला येथील दुसऱ्या क्रॉस रोडवरील एका बंगल्यात त्यांचा मुलगा, सून आणि दोन नातींसोबत राहतात. हा बंगला तळमजला अधिक दोन मजली आहे. तळमजल्यावर एक लॉबी, स्वयंपाकघर आणि जेवणाची जागा आहे, तर पहिल्या मजल्यावर चार बेडरूम आहेत आणि दुसऱ्या मजल्यावर एक खोली, ग्रंथालय आणि स्टोअर रूम आहे.

सिंग यांनी एफआयआरमध्ये दावा केला आहे की, त्यांचा ५३ वर्षीय मुलगा कुटुंबासह २७ डिसेंबर रोजी गोव्याला गेला होता. ही घटना २९ डिसेंबरच्या रात्री आणि ३० डिसेंबरच्या पहाटेच्या दरम्यान घडली. तक्रारदार आणि त्यांच्या सुनेचे आई-वडील घरीच थांबले होते. रात्रीचे जेवण झाल्यावर, तक्रारदार दुसऱ्या मजल्यावर झोपल्या होत्या, तर त्यांचे पाहुणे पहिल्या मजल्यावरील गेस्ट रूममध्ये झोपले होते. घरातील कामासाठी ठेवलेले दोन नोकर तळमजल्यावर स्वयंपाकघराजवळ झोपले होते.

आरोपीने बाथरूममधून घरात प्रवेश केला आणि पहिल्या मजल्यावरील बेडरूममधून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरली. सकाळी ७:३० वाजता तक्रारदार उठल्या तेव्हा त्यांना बाथरूमची खिडकी उघडी दिसली, तेव्हा ही घटना उघडकीस आली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर त्यांनी घरकाम करणाऱ्यांना माहिती दिली, ज्यांनी संपूर्ण घर तपासले आणि दुसऱ्या मजल्यावरील ग्रंथालयाची खिडकी तुटलेली आढळली. पहिल्या मजल्यावरील बेडरूममधून मौल्यवान वस्तू गायब होत्या, असेही त्यांनी सांगितले.

सदर बंगला अभिनेता अभिमन्यू सिंग यांचा आहे.