नऊ महागड्या मोटारसायकलींसह ३ जणांना अटक

अंधेरी- अंधेरी पोलिसांनी (Andheri Police Station) महागड्या मोटारसायकली (Bike) चोरी केल्याच्या आरोपाखाली तिघांना अटक केली आहे आणि सुमारे १८ लाख रुपयांच्या नऊ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी सांगितले की, एका तक्रारदाराने अंधेरी पोलिसांकडे १३ जानेवारी रात्री ते १४ जानेवारी सकाळच्या दरम्यान अंधेरी पूर्वेतील (Andheri East) गुंदवली (Gundvali) परिसरातील महानगरपालिका प्रभाग कार्यालयाजवळून (KE BMC Ward office) त्याची रॉयल एनफील्ड क्लासिक ३५०(Royal Enfield Classic 350) चोरीला गेल्याची तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या (BNS) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि आपली तपासमोहिम सुरू केली.

तपासादरम्यान, गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीचा वापर करून संशयितांना साकीनाका आणि संघर्ष नगर भागात शोधून काढले. पोलिसांना असे समजले की संबंधित आरोपी रात्री सक्रिय असतात आणि काही दिवस घरी परतत नाहीत.

दोन ते तीन दिवस रात्रीच्या गस्तीनंतर, पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान अनेक चोरीच्या स्पोर्ट्स बाईक जप्त केल्या, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपींची नावे ओंकार सुनील फासगे (२२) व्यवसाय – रिक्षाचालक, सागर राहुल गायकवाड (१९) व्यववसाय- बेरोजगार आणि कार्तिक विष्णू हास्के (१८) व्यवसाय- विद्यार्थी, अशी आहेत. तिघेही साकीनाका येथील संघर्ष नगर परिसरातील रहिवासी आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की जप्त केलेल्या मोटारसायकलींमध्ये रॉयल एनफील्ड क्लासिक ३५०, पल्सर एन४०० (Pulsar N 400), यामाहा एमटी-१५ (Yamaha MT 15), केटीएम ड्यूक(KTM Duke) आणि यामाहा आरएक्स१०० (Yamaha RX 100) यांचा समावेश आहे. या मोटारसायकली अंधेरी, विलेपार्ले (Vileparle), भांडुप (Bhandup), घाटकोपर (Ghatkopar), अँटॉप हिल (Antop Hill), काळाचौकी(Kalachowky), खारघर(Kharghar) आणि परळ(Parel) पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गजानन पवार, उमेश मच्छिंदर, विनोद पाटील, पोलिस उपनिरीक्षक पेरकाले, पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक पेडणेकर, हेड कॉंस्टेबल शिंदे, हेड कॉंस्टेबल पुजारी, हेड कॉंस्टेबल घाडवले, पोलिस शिपाई म्हात्रे, पोलिस शिपाई लोंढे, पोलिस शिपाई पाटील, पोलिस शिपाई मोरे, पोलिस हेड कॉंस्टेबल विशाल पिसाळ यांच्यासह वरिष्ठ मुंबई पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली, असे मिड-डेच्या वृत्तांत म्हटले आहे.