अंधेरी : अंधेरी (Andheri) येथील चार बंगला (Four Bungalow) परिसरातून एका पादचाऱ्याला अचानक धडक देऊन पळून जाण्याचा प्रकार समोर आला आहे. रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला वेगाने जाणाऱ्या एका बाईकस्वाराने धडक दिली. धडक दिल्यानंतर, बाईकस्वार जखमी व्यक्तीला सोडून पळून गेला.

दरम्यान बाईकस्वार फरार आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी ५:०० वाजता घडली. सीसीटीव्ही फुटेज जवळच्या चहाच्या टपरीवरील असल्याचे दिसून येते.

फुटेजमध्ये रस्ता ओलांडत असताना पादचाऱ्याला वेगाने येणारी मोटारसायकल धडकल्याचे दिसून येते. अपघातानंतर बाईकस्वार जमिनीवर पडून पळून जातानाही दिसत आहे.

आरोपी सुमारे १८-१९ वर्षांचा असल्याचे सांगितले जात आहे. अपघातग्रस्त तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या डोक्याला नऊ टाके लागले आहेत, तसेच काही किरकोळ दुखापती झाल्या आहेत. संबंधित मोटारसायकल निळ्या रंगाची प्लॅटिना असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी कोणत्याही पोलिस तक्रारीची नोंद नाही, असे फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तात म्हटले आहे.