दोन सुरक्षा रक्षकांनी वाचवले शेकडो रहिवाश्यांचे प्राण
अंधेरी- अंधेरी पश्चिमेकडील (Andheri) सोरेंटो टॉवर या २३ मजली निवासी इमारतीला गुरुवारी सकाळी लागलेल्या आगीत (Fire) दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. या उंच इमारतीत सुमारे २०० रहिवासी राहतात. अभिनेता पुष्कर जोग (Actor Pushkar Jog) हे देखील या इमारतीच्या 12 व्या मजल्यावर राहतात. त्यांच्या फ्लॅटसमोरील १२ व्या मजल्याच्या पॅसेज क्षेत्रातील विद्युत वायरिंगमुळे आग लागली. ती आग एका डक्टद्वारे १६ व्या मजल्यावर पसरली.
सुरक्षा रक्षकांनी १२ व्या मजल्यावर धाव घेतली. अग्निशमन संदेश प्रणाली वेळेवर सक्रिय करण्यात केली. त्यांनी सुमारे ३८ अग्निशामक यंत्रांच्या मदतीने ताबडतोब आग आटोक्यात आणली. सुरक्षा रक्षक मिठू झा आणि सुरक्षा पर्यवेक्षक परवेश शेख हे खरे नायक म्हणून समोर आले. त्यांनी मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.
मिड-डे शी बोलताना अभिनेता पुष्कर जोग यांनी सुरक्षा रक्षकांच्या या धाडशी कामगिरीबद्दल कौतुक केले. जोग म्हणाले की, ”सुरक्षा रक्षकांनी वेळेवर कारवाई केल्यामुळे इमारतीतील प्रत्येक रहिवासी सुरक्षित आहे. सकाळी आमच्या सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आग लागल्याचा मेसेज आला. मी माझ्या कुटुंबासह २० व्या मजल्यावर घरी होतो. माझा १२ व्या मजल्यावर एक फ्लॅट आहे जिथे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. आग वरच्या मजल्यावर पसरली, त्यामुळे रहिवासी अडकले, परंतु सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत.” ते पुढे म्हणाले, “धुराचे लोट खूप दाट होते, परंतु सुरक्षा रक्षकांनी अनेक अग्निशामक यंत्रे वापरली आणि आम्हा सर्वांना वाचवण्यात यश आले. आम्ही त्यांचे खरोखर आभारी आहोत.”
परवेश शेख म्हणाले, “सकाळी आम्ही सोसायटीच्या गेटवर नियमित प्रवेश तपासणी करत असताना अचानक फायर अलार्म वाजला. आम्ही ताबडतोब वरच्या मजल्यावर धावलो. तपासणी केल्यावर आम्हाला आढळले की पॅसेज परिसरातील १२ व्या मजल्यावर आग लागली होती आणि डक्टमधून ती १६ व्या मजल्यापर्यंत पसरली होती. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत आग मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली होती. बहुतेक रहिवासी १६ व्या मजल्यावर जमले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने त्यांना सुरक्षितपणे वाचवले.”
गोरेगाव अग्निशमन दलाचे (Mumbai Fire Brigade)अग्निशमन अधिकारी योगेश महाजन म्हणाले, “आगीची माहिती मिळताच, आम्ही चार अग्निशमन गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली. आम्हाला आढळले की ही आग लेव्हल -१ ची होती. सोसायटीची अग्निशमन यंत्रणा काम करत होती. सुरक्षा रक्षक अग्निशामक यंत्रे वापरत असल्याचे आम्हाला दिसले. आग विझविण्यासाठी आम्ही सोसायटीतील पाण्याचाही वापर केला. बरेच रहिवासी टेरेसवर गेले होते आणि काही त्यांच्या फ्लॅटमध्ये होते. आग विझवल्यानंतर आम्ही प्रत्येक मजल्याची तपासणी केली.”
