भाजपचे माजी नगरसेवक अभिजीत सामंत यांचे महापालिकेला पत्र

अंधेरी – माघी गणेश जयंती गुरुवार, २२ जानेवारी रोजी येत आहे. उत्सवादरम्यान रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून के-पूर्व वॉर्ड (अंधेरी पूर्व) (Ward K-east) (Andheri East) आणि आसपासच्या भागात पाणीपुरवठा आणि जलवाहिनी संबंधी कामाच्या वेळापत्रकात बदल करण्याची विनंती भाजपचे (BJP) माजी नगरसेवक अभिजित सामंत (Abhijit Samant) यांनी मुंबई महानगरपालिकेला (BMC) केली आहे.

अंधेरी पूर्वेतील कोलडोंगरी येथील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक अभिजित सामंत यांनी सोमवारी आरोप केला की, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) हिंदू सणांच्या पूर्वसंध्येला नियोजित कामे सुरू करते. परिणामी उत्सवादरम्यान समाजाला अडचणी येतात.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांना लिहिलेल्या पत्रात सामंत यांनी म्हटले आहे की, या भागात नियोजित मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) कामासाठी काही पाण्याच्या जलवाहिनीचे मार्ग बदलणे आवश्यक आहे. हे काम मंगळवार, २० जानेवारी आणि बुधवार, २१ जानेवारी रोजी होणार आहे. अशा कामासाठी अनेकदा पाणीपुरवठा दोन दिवसांसाठी खंडित केला जातो.

गुरुवार, २२ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती असल्याने, उत्सवाच्या पूर्वसंध्येला के-पूर्व वॉर्ड (अंधेरी पूर्व) आणि इतरत्र पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून सामंत यांनी मुंबई महापालिकेला कामाचे वेळापत्रक बदलण्याची विनंती केली असल्याचे मिड-डेच्या वृत्तात म्हटले आहे.

सामंत यांच्या पत्नी अंजली यांनी अभिजीत सामंत यांच्या पूर्वीच्या प्रभाग क्र. ८४ मधून महापालिका निवडणूक जिंकली आहे.