विरार – विवा महाविद्यालयात सांस्कृतिक मंडळाच्या वतीने ” सक्षम” या सांस्कृतिक सप्ताहाला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी यंदा ‘सक्षम रंगमंच’ या नव्या संकल्पनेने भव्य आणि ओघवत्या वातावरणात सांस्कृतिक सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्याने महाविद्यालयाच्या वार्षिक सांस्कृतिक सप्ताह २०२५-२६ ची औपचारिकरीत्या सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग,कलाकृतींचा जलवा आणि सांस्कृतिक तेजाने महाविद्यालय उत्साहाने उजळून निघाले.या कार्यक्रमाचे उद्घाटन विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार शिखर ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समिती प्रमुख प्रियांका ब्रिद , सांस्कृतिक समिती सहकार्यवाहक अभिषेक माडये, आयक्यूएसई समन्वयक डॉ. रोहन गवाणकर, आयक्यूएसई सहसमन्वयक डॉ. अनुश्री किणी, विवा स्टुडंट काउन्सिलच्या प्रमुख तृप्ती पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एलिना गोन्साल्विस आणि डॉ. रोहन गवाणकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात ढोल ताशा पथकाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वादनाने झाली. यावेळी ढोल ताशांच्या तालावर प्रमुख पाहुणे शिखर ठाकूर यांनी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या आणि महाविद्यालयाच्या शिक्षकांसोबत रेड कार्पेटवर वॉक करत कार्यक्रमाची सुरुवात केली.
‘सक्षम रंगमंच’चा शुभारंभ हा विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला दिशा देणारा, कलाविकासाला चालना देणारा आणि सांस्कृतिक समृद्धी वाढवणारा उपक्रम ठरला असून महाविद्यालयात या सोहळ्याचे प्रचंड कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा उत्सव साजरा करण्यासाठी विवा महाविद्यालय सज्ज झाले आहे.
कार्यक्रमाच्या शुभारंभानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांनी सभागृहात रंगत निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला असून त्यांची कलात्मक उंची पाहून उपस्थितांनी मनापासून दाद दिली. वार्षिक स्नेहसंमेलनाचा हा संपूर्ण आठवडा विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांनी गजबजलेला असणार आहे. यात समूहनृत्य, गायन, फॅशन शो, स्किट, वादविवाद, पोस्टर स्पर्धा, कला प्रदर्शन तसेच क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी तरुणाईची खास आवड असलेल्या ई-स्पोर्ट्स (बीजीएमआय, फ्री फायर) चा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. यामुळे महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या सहभागाने एकूणच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सक्षम रंगमंचामुळे महाविद्यालयात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्र ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, संस्थेचे खजिनदार श्री शिखर हितेंद्र ठाकूर,विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, श्रीनिवास पाध्ये, संजय पिंगुळकर यांनी या सांस्कृतिक सप्ताहाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.. कार्यक्रमासाठी विवा स्टुडंट काउन्सिलच्या सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
