नात्यांचा गुंता, प्रेमातील गोडवा आणि थोडीशी नोकझोक सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ (Bin Lagnachi Goshta Movie) हा चित्रपट सध्या ॲमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) ट्रेंडिंग ठरत आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटीवरही या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ज्यांना हा चित्रपट चित्रपटगृहात पाहाता आला नाही, त्यांना आता ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर पाहाता येईल.
नात्यांमधील समज, मतभेद, विश्वास आणि जिव्हाळा या सगळ्यांचा सुंदर मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळतो. आधुनिक काळातील नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहाणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आपलासा वाटत आहे. ओटीटीवर आल्यानंतर नव्या प्रेक्षकवर्गाकडूनही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून तो सध्या चर्चेत आहे.
प्रिया बापट(Priya Bapat) आणि उमेश कामत(Umesh Kamat) या रिअल लाईफ कपलची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावली आहे आणि या चित्रपटातही त्यांच्या नात्यातील गोड-तिखट प्रसंगांनी प्रेक्षकांना भावनिक केले आहे. त्यांच्या सोबत गिरीश ओक(Girish Oak), निवेदिता सराफ(Nivedita Saraf), सुकन्या मोने(Sukanya Mone) आणि संजय मोने(Sanjay Mone) यांच्या दमदार अभिनयाने चित्रपट अधिक प्रभावी झाला आहे.
दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ” ‘बिन लग्नाची गोष्ट’ आपल्याच आजूबाजूच्या नात्यांचे प्रतिबिंब आहे. नात्यातील मतभेद, एकमेकांवरील विश्वास आणि एकत्र प्रवास हे या चित्रपटात आम्ही दाखवले आहे. ॲमेझॉन प्राईमवर चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होतो आहे.”
निर्माते नितीन वैद्य म्हणतात, ”हा चित्रपट नात्यांच्या बदलत्या स्वरूपावर विचार करायला भाग पाडणारा आहे. आजच्या पिढीचे आयुष्य, त्यांची नात्यांकडे पाहाण्याची दृष्टी, त्यातील गोडवा आणि संघर्ष हे या चित्रपटात मांडले आहे. चित्रपटगृहानंतर ओटीटीवर मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आमच्यासाठी बक्षीस आहे.”
गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाची कथा समीर कुलकर्णी यांची आहे. तर दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले आहे.
