ठरले राज्यात सर्वाधिक पुरस्कार पटकावणारे महाविद्यालय
मुंबई : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे २५ फेब्रुवारी २०२६ रोजी करिअर कट्टाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात विरार येथील विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या विवा महाविद्यालयाने तब्बल ११ पुरस्कार पटकावत राज्यात सर्वाधिक पुरस्कार प्राप्त करणारे महाविद्यालय म्हणून मानाचा तुरा रोवला आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान उद्योगमंत्री मा. उदय सामंत यांनी भूषविले. या सोहळ्यावेळी उच्च शिक्षण विभाग , महाराष्ट्र शासनाचे संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळणकर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. करुणा गोकर्ण, विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ. अतुल साळुंखे, स्नेहा जगदाळे, डॉ. बबन सिनगारे, डॉ. अनुश्री किणी, डॉ. वैभव सातवी, सहाय्यक प्राध्यापक विनोद डीडवाना, सहाय्यक प्राध्यापक विकास गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
“विकसित भारत २०४७ : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाची भूमिका ” एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा सन २०२६ चे औचित्य साधत राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा वितरण आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे भास्कर वामन ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स, यशवंत केशव पाटील कॉलेज ऑफ कॉमर्स, विद्या दयानंद पाटील कला महाविद्यालय (विवा कॉलेज) ला उत्कृष्ट राज्यस्तरीय प्रथम महाविद्यालय, प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांना उत्कृष्ट विभागीय समन्वयक, मुंबई विभागात प्रथम क्रमांकाचे उत्कृष्ट विभागीय महाविद्यालय, उत्कृष्ट करिअर संसद, जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय, राज्यस्तरीय आयोजित रिल स्पर्धा २०२५ स्पर्धेत भावेश विधाते ( प्रथम ) विजेता , AWS करिअर टूर राज्यस्तरीय प्रथम क्रमांक, AWS करियर टूर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक, जिल्हास्तरीय आयोजित रिल स्पर्धा विजेते, जिल्हास्तरीय आयोजित रिल स्पर्धा प्रथम ( भावेश विधाते) पालघर जिल्हा स्तरीय चिन्मय भोईर द्वितीय क्रमांक विजेता, AWS विभागीय पातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अश्या विविध उल्लेखनीय ११ पुरस्काराने विवा महाविद्यालयाने बाजी मारली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत विवा महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या ऐतिहासिक यशामुळे महाविद्यालयाचे नाव राज्यभरात उजळले असून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
