अंधेरी- अंबोली पोलिसांनी सोमवारी सांगितले की, एका दारू प्यायलेल्या व्यक्तीने अंधेरी येथील ४४ वर्षीय रहिवाशावर ज्वलनशील द्रव ओतून त्याला पेटवून दिले. या घटनेत राजेंद्र यादव (४४) हा पीडित २५ टक्के भाजला. या घटनेसंदर्भात पोलिसांनी नागेंद्र यादव नावाच्या एका व्यक्तीला हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक केली आहे. पिडीत राजेंद्र यादव (४४) हा जोगेश्वरी (पश्चिम) येथील यादव नगर परिसरात त्याच्या कुटुंबासह राहतो.

पोलिसांनी राजेंद्रचा जबाब नोंदवला आहे आणि नागेंद्रविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे, असे अंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद कोकाटे यांनी सांगितले. रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास राजेंद्र कामावरून परतला. त्याच्या घराजवळ त्याची बाईक पार्क केल्यानंतर ही घटना घडली. राजेंद्र याने त्याचा पुतण्या पंकज यादव (२२) त्याच्या पान दुकानात दारू प्यायलेल्या नागेंद्रशी वाद घालताना पाहिले. नागेंद्र सिगारेट उधार घेत होता. पण त्याने अजून पैसे दिले नव्हते. राजेंद्रने वादात हस्तक्षेप केला आणि त्याच्या पुतण्याला थांबण्यास आणि नागेंद्रला पान दुकानापासून दूर राहण्यास सांगितले. रागावलेला नागेंद्र तिथून निघून गेला. १५ मिनिटाने बाटलीमध्ये ज्वलनशील द्रव घेऊन परत आला. त्याने मागून राजेंद्रच्या शर्टवर द्रव ओतला आणि काडी पेटवली, असा आरोप पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, राजेंद्रचा शर्ट पूर्णपणे जळाला होता. त्याची पाठ सुमारे २५ टक्के भाजली. तो इकडे तिकडे धावू लागला, आजूबाजूच्या लोकांनी आग विझवली. त्याचा पुतण्या आणि इतरांनी त्याला जोगेश्वरी येथील ट्रॉमा सेंटर रुग्णालयात नेले. तेथून त्याला जोगेश्वरी (पश्चिम) येथील मल्लिका रुग्णालयात हलवण्यात आले. या रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.