अंधेरी: अंधेरी पूर्व येथील भूमिगत टी२ विमानतळ मेट्रो स्टेशनवर बुधवारी दुपारी ४:१० च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. स्टेशनच्या आवारात धूर दिसू लागल्यानंतर प्रवाशांना तातडीने तेथून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आपत्कालीन पथकांनी परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवले.
संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग मेट्रो स्टेशनच्या तांत्रिक कक्षात (Technical Room) लागली होती. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि दोन जंबो टँकर्स तातडीने घटनास्थळी पोहोचले. दुपारी ४:३० वाजेपर्यंत आग विझवण्यात अग्निशमन दलास यश आले. भूमिगत स्थानकात धूर मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना कारवाई दरम्यान श्वासोच्छवासाच्या उपकरणांचा वापर करावा लागला.
या घटनेमुळे मेट्रो ॲक्वा लाईन ३ (आरे जेव्हीएलआर ते कफ परेड) दरम्यानची सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMRCL) एका निवेदनात याला ‘लहान धुराची घटना’ (Minor smoke incident) असे संबोधले असून खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ गाड्या टी२ स्थानकावर थांबवण्यात आल्या नव्हत्या, असे इंडिया टीव्ही न्यूज डॉट कॉम च्या वृत्तात म्हटले आहे.
