बोरिवली- जैन दीक्षा महोत्सव 2026(Jain Diksha Mahotsav 2026) चे आयोजन बोरिवली पश्चिमेतील(Borivali West) चिकुवाडी परिसरात करण्यात येत आहे. “संयमरंग उत्सव” या नावाने हा पाच दिवसीय महोत्सव ४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी या महोत्सवाचा परिपूर्ण दिवस साजरा केला जाईल. या दिवशी १८ पुरुष व ४६ महिला दीक्षार्थी एकाच मंडपात सामूहिक जैन दीक्षा स्वीकारतील.
या महोत्सवासाठी २,५०,००० चौरस फूट क्षेत्रात आध्यात्मिक नगरी उभारण्यात आली आहे. हा दीक्षा सोहळा गच्छाधिपती पूज्य सोमसुंदरसूरीजी महाराज यांच्या उपस्थितीत तसेच अनेक पूज्य आचार्य भगवंतांच्या सान्निध्यात संपन्न होणार आहे.
पूज्य शांतिचंद्रसूरी परंपरेतील जैनाचार्य पूज्य जिनचंद्रसूरीजी महाराज साहेबांचे शिष्य, पूज्य योगतिलकसूरीजी महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही दीक्षा संपन्न होईल. या महोत्सवात ८०० हून अधिक साधु-साध्वी भगवंतांची पावन उपस्थिती लाभणार आहे.
पाच दिवसांच्या कालावधीत २,००,००० हून अधिक भाविकांसाठी साधार्मिक भक्ती (भोजन) व्यवस्था करण्यात आली आहे. विशाल भोजन मंडपात एकाच वेळी १०,००० पेक्षा अधिक भाविक बसून भोजन करू शकतील. तसेच दररोज तीन वेळा भोजन सेवा दिली जाईल.
या उत्सवाचा आध्यात्मिक संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा यासाठी १,००,००० हून अधिक घरांमध्ये मिठाई अर्पण करण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक महोत्सवासाठी मुंबईतील २०० हून अधिक जैन संघ तसेच १,८०० विश्वस्तांना आमंत्रित करण्यात आले असून, संपूर्ण जैन समाजात विशेष उत्साहाचे वातावरण आहे.
दररोज देरासर परिसर १,००० हून अधिक दिव्यांनी उजळवण्यात येईल. सायंकाळच्या वेळी मनन संघवी, शिवम सिंग, सनी शाह यांच्यासह १२ नामवंत कलाकार भक्तीगीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. दीक्षार्थ्यांचा विदाई समारंभ तसेच भव्य वर्षीदाना यात्रा हे विशेष आकर्षण ठरणार आहे.
या आध्यात्मिक नगरीत शौर्य गाथा, विशेष निर्मित आध्यात्मिक दालन, भव्य मंदिरे आणि अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना भाविकांसाठी उपलब्ध असतील.
या दीक्षा महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ७२ वर्षांपासून ते ९ वर्षांपर्यंतच्या दीक्षार्थ्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये तीन संपूर्ण कुटुंबे आणि चार दाम्पत्ये (पती-पत्नी) एकत्रितपणे सांसारिक जीवनाचा त्याग करून दीक्षा स्वीकारणार आहेत. अनेक दीक्षार्थी उच्चशिक्षित व व्यावसायिक पार्श्वभूमीचे असून, त्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट, भौतिकशास्त्रातील पीएच.डी., आर्किटेक्ट, फूड टेक्नॉलॉजिस्ट, बी.ए.-एल.एल.बी., इंटिरियर डिझायनर, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी तज्ज्ञ तसेच कला व विज्ञान शाखेतील पदव्युत्तर शिक्षित व्यक्ती यांचा समावेश आहे.
दीक्षार्थी भारताच्या नऊ राज्ये व शहरांमधून – सूरत, अहमदाबाद, बनासकांठा (भाभर, थराड, वाव), सौराष्ट्र, मुंबई, पुणे, उदयपूर, हिंगणघाट, रायपूर आणि उज्जैन – तसेच अमेरिकेतील (USA) दोन दीक्षार्थी सहभागी होत आहे.
हा संपूर्ण उपक्रम अध्यात्म परिवार यांच्या पुढाकाराने व उदार लाभार्थ्यांच्या सहकार्याने राबवला जात असून, ७०० हून अधिक सेवाभावी कार्यकर्ते निष्काम भावनेने सेवा देत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, पूज्य योगतिलकसूरीजी महाराज साहेबांच्या पावन निश्रेत २०१९ साली याच चिकुवाडी परिसरात ४४ जणांची सामूहिक दीक्षा संपन्न झाली होती, तसेच गेल्या दहा वर्षांत त्यांच्या मार्गदर्शनातून ३५० हून अधिक जणांनी दीक्षा स्वीकारली आहे. तसेच २०२६ हे वर्ष पूज्य शांतिचंद्रसूरीजी महाराज साहेबांच्या दीक्षेचे शताब्दी वर्ष असल्याने हा एक मंगल योग ठरत आहे.
