समोर कितीही दुःखाचा डोंगर उभा असला, तरी त्या डोंगराला सामोरे जाण्याची हिंमत जर मनात असेल, तर एक स्त्री समाजासाठी काय करू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे सुनेत्रा पवार(Sunetra Pawar). “याची देही, याची डोळा” आज महाराष्ट्राने पाहिले. वेदनांना शब्द देणारी, आणि दुर्लक्षितांच्या अश्रूंना आवाज देणारी एक संवेदनशील नेतृत्त्वाची वाटचाल आता सुरू होत आहे.
सुनेत्रा पवार या केवळ एका राजकीय घराण्याचे नाव नाहीत, तर त्या एक सामाजिक जाणीव असलेली व्यक्तिमत्त्व आहेत. स्वर्गवासी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी असल्या, तरी त्यांची ओळख केवळ त्या नात्यापुरती मर्यादित नव्हती. सामाजिक कार्य, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि तळागाळातील लोकांच्या प्रश्नांबाबत त्यांची तळमळ सातत्याने या आधी दिसून आली आहे.
संघर्ष हा त्यांच्या आयुष्याचा भाग राहिला आहे. वैयक्तिक दुःख, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सार्वजनिक अपेक्षांचा भार पेलत असतानाही त्यांनी कधीच माणुसकीचा हात सोडला नाही. ज्यांच्या आवाजाला व्यासपीठ नाही, त्यांच्यासाठी उभं राहणं हेच त्यांचं खरं सामर्थ्य आहे. सत्तेपेक्षा संवेदना मोठी असते, हे त्यांच्या कृतीतून वारंवार अधोरेखित होतं आलं आहे.
आज महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा केवळ राजकारणापुरत्या नाहीत, तर माणुसकीच्या, न्यायाच्या आणि समतेच्या आहेत. एक स्त्री म्हणून, एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या या अपेक्षांना न्याय देतील, अशी खात्री वाटते.
शुभम रेखा शंकर पेडामकर
