सन १९४७ ते २०२५ या ७८ वर्षांच्या कालखंडात भारताने एकूणात बरीच मजल मारलीय. मात्र याच ७८ वर्षांत ‘कम्युनिस्ट चीन’ आमच्या कितीतरी पुढे गेलाय. आमचे अजूनही प्रचंड काम बाकी आहे जे आजच्या गुंतागुंतीच्या जगात आणखीनच जटील झाले आहे. नवा समर्थ भारत जर घडवायचा असेल तर आमची अपरिमित हानी करणाऱ्या सहा घटकांचा आधी आम्हाला समांतरपणे व वेगाने बंदोबस्त करावा लागेल. या सहा घटकांना पूर्णपणे दूर केल्याशिवाय तुम्हाला – मला हवा असणारा “नवा समर्थ भारत” काही घडणार नाही. आम्ही ‘विश्वगुरू’ होण्याची कितीही लालसा बाळगली (जी मुळात बाळगण्याची गरज नाही) तरी ‘भारत’ नावाच्या देहाला लागलेले हे सहा रोग दूर केल्याशिवाय ‘भारतीय’ आत्मा काही पूर्णपणे कार्यरत होणार नाही. भारतीय पारंपारिक तत्वज्ञानानुसार ‘मंदलय’ आत्मा धारण करणारे शरीर मोठा पराक्रम करू शकत नाही. म्हणजे बघाना ‘एकूण जीडीपी’चे गौरवगान करणाऱ्या आम्हा भारतीयांचे ‘दरडोई उत्पन्न’ हे खूप छोट्या असणाऱ्या अनेक देशांपेक्षाही कमी आहे. अनेक आंतरराष्ट्रीय परीमाणांवर आम्ही आजही अनेक विकसित देशांच्या तुलनेत किमान ५० – ६० वर्षांनी मागासलेले आहोत. सन २०४७ मध्ये आम्हाला एक पूर्णपणे विकसित राष्ट्र व्हायचंय ज्यासाठी फक्त इतिहासात रमून किंवा मोठ्या सिंहगर्जना करुन कार्यभाग साधणार नाही. सत्याचा अभ्यास न करता आम्हाला आमच्या प्रत्येक गोष्टीला अहंकाराने “सनातन” म्हणायचे असते. आम्ही इतके अल्पसंतुष्ट असतो की एक जानेवारीला फक्त “इंग्रजी वर्षाच्या” असा लबाडीचा उल्लेख करीत नववर्षाच्या शुभेच्छा आम्ही देत असतो, भलेही मग आजच्या काळात “आमचा” म्हणून देदीप्यमान पराक्रम हा खूप कमी असला तरी चालेल ! काही सन्माननीय अपवाद सोडता जगाच्या नजरेत कौतुकास्पद असा फारसा मोठा पराक्रम हल्ली आम्ही केलेला नाही. हुशारीने आम्ही मागासलेल्या काही मुस्लीम देशांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ ठरवीत असतो नि धूर्तपणे चीनशी तुलना टाळत असतो. झाडाच्या मुळांमध्ये व खोडामध्ये समस्या असेल तर फक्त त्याच्या फांद्यांना स्वच्छ करुन भागत नाही. वार्षिक अर्थसंकल्पाकडे या दृष्टीने पहायला हवे.

गेल्या साडेतीन हजार वर्षांमध्ये आमची भयंकर हानी करणारा पहिला घटक म्हणजे आमचे तथाकथित सामाजिक तत्वज्ञान जे अत्यंत अन्यायी व मूठभरांच्या वर्चस्ववादावर आधारलेले होते व आहे. जे तत्वज्ञान तब्बल ९० % भारतीयांना शूद्र बनवते आणि स्त्रीला वामांगी ठरवते, जे तत्वज्ञान मेंदू व मनगटाला पूर्णपणे कार्यरत न करता माणसाला दैववादी बनवते, जे तत्वज्ञान कर्मकांडांनी सामान्य लोकांना जर्जर बनवते, जे तत्वज्ञान अंधश्रद्धांना पोसत जनतेला निर्बुद्ध बनवते, जे तत्त्वज्ञान वरवरची फसवी मलमपट्टी करते परंतु ‘व्यवस्था बदला’ला चालना देत नाही आणि जे तत्वज्ञान अन्यायी व्यक्तींना पूज्यनीय ठरवते त्या सामाजिक तत्वज्ञानाबद्दलची शेखी मिरवून काय उपयोग ? आमच्या येथील सहिष्णूता ही बहुजनांनी आचरणात सांभाळली आहे. तिचे श्रेय अभिजनांनी घ्यायची गरज नाही. वर्चस्ववादी अभिजनांचे अमानवी तत्वज्ञानाचे दृश्य स्वरूप म्हणजे येथील चातुर्वर्ण्यव्यवस्था. याच त्याज्य तत्वज्ञानाने सामाजिक, राजकीय व व्यावसायिक जीवनास रोगट बनविल्याने जवळपास संपूर्ण उत्तर भारतीय आडवा पट्टा हा आजही मागासलेला राहिला आहे जिथे भारतातील लोकसंख्येचा स्फोट अनुभवास येतो. (मुख्यत्वे धार्मिक अंधश्रद्धांमुळे १९४७ मधील आमची लोकसंख्या आज साडेचार पटीने वाढली आहे जे एक मोठे आव्हान बनले आहे.) याच उत्तर भारतीय पट्ट्यातील तीर्थक्षेत्रांना ‘पावन’ समजण्याची आमची सार्वजनिक श्रद्धा आहे परंतु येथीलच लाखो युवक नोकऱ्या आणि शिक्षणासाठी दक्षिण भारतात येतात. अनाडी, अंधश्रद्ध व स्त्रिया आणि बहुजनांबाबत असभ्य असणारे वर्चस्ववादी लोक या गायपट्टयात अधिकांश दिसतील. जे तत्वज्ञान “ज्ञानमंदिरां”ना महत्व व मदत पुरेशी देऊ शकत नाही ते तत्वज्ञान नवा भारत कसा घडविणार ? दुर्दैवी गमतीचा भाग असा की जे काही ठराविक सामाजिक घटक या निरुत्पादक तत्वज्ञानाचा उठता बसता जयघोष करीत असतात त्यांची बरीच हुशार मुले मात्र आज पश्चिमी देशांत शिकायला व स्थायिक व्हायला जातात. जे तत्वज्ञान असा सामाजिक – सांस्कृतिक ढोंगीपणा आमच्या जनुकांमध्ये मुरवते ते तत्वज्ञान जीवनोपयोगी कसे ठरणार ? आम्हाला नवा भारत सर्व परीमाणांवर उत्तम घडवायचा असेल तर आमच्या तत्वज्ञानाला सर्वंकषपणे दुरुस्त करावे लागेल.

दुसरा हानिकारक घटक होता व आहे – आमची शिक्षण पद्धती. या पद्धतीचा र्हास साडेतीन हजार वर्षांपूर्वीच सुरू झाला होता. येथील बहुजनांनी जगण्यासाठी आवश्यक अशी जी उत्तमोत्तम कौशल्ये व शास्त्रे पूर्वी विकसित केली होती ती या शिक्षण पद्धतीत दुय्यम ठरवली गेली. काही उत्तम अपवाद वगळता तत्वज्ञानाचा अभ्यास म्हणून विद्यार्थ्यांच्या माथ्यावर बरेच थोतांड मारले गेले. बहुतांशपणे शाब्दिक पोपटपंचीलाच ज्ञान समजल्याने आमची संशोधकीय वृत्ती मारली गेली. गुरुशी वाद घालण्याची किंवा त्याच्या गृहितकांबद्दल शंका व्यक्त करण्याची अनुमती फारशी नव्हती. प्रश्न विचारणे म्हणजे अश्रद्ध असणे, अशी लबाडीची व्याख्या बनवली गेली. कपोलकल्पित कर्मकांडांना ‘पूज्यनीय ज्ञाना’ची उपाधी दिल्याने व असे नुकसानकारक ज्ञान वाटणाऱ्यांना वंदनीय मानल्याने काही सामाजिक घटक सोडता बहुतांश भारतीय समाज हा सर्वार्थाने मागासलेला राहिला. चरक, सुश्रुत, आर्यभट, सांख्य दर्शनकार कपील हे सर्व बहुजनांपैकीच असलेले संशोधक होते. नंतर मात्र ही बौद्धिक परंपरा खंडित झाली आणि अनुत्पादक अशा ग्रांथिक पाठांतराला “ज्ञानार्जन” हे नाव दिले गेले. आम्ही स्वतःलाच इतके ‘ग्रेट’ समजू लागलो की आमच्या ग्रंथांमधूनही ही दर्पोक्ती दिसू लागली. जगातील प्रगतीचे मापदंड माहीत नसल्याने इंग्रजांच्या बंदुकांचा मुकाबला आम्ही तलवारींनी कसा करणार होतो ? पावसासाठी आणि शत्रूच्या नाशासाठी इंद्राची प्रार्थना करणारा समाज हा मागासलेला राहिला कारण त्याने आपल्या तथाकथित प्रार्थनेला वैज्ञानिक संशोधनांची व सामाजिक समतेची जोड दिली नाही. सहस्रो वर्षांच्या सडलेल्या शिक्षण पद्धतीचा परिणाम असा झाला की आजही आमची बरीच जीवनावश्यक आयुधे आम्हाला आयात करावी लागतात. रेडिओ पासून मोबाईल आणि ट्रेनपासून विमान, अशी हजारो संशोधने पाश्चिमात्यांनी लावली. आमच्या येथील काही सामाजिक घटकांचा मूर्खपणा किंवा लबाडी अशी की स्वतःचे प्रामाणिक मूल्यमापन करण्याऐवजी “आमच्याकडे सर्व ज्ञान होते नि आहे” अशी आत्मवंचना हे करु लागले. (जे काही किमान व्यावसायिक ज्ञान होते ते फार पूर्वी बहुजनांनी विकसित केलेले होते.) अभिजनांचे एवढे सारे ज्ञान किंवा श्रेष्ठत्व होते तर अशा महाकाय भारतीय उपखंडावर आधी मुघल पाचशे वर्षे आणि नंतर फक्त काही हजार ब्रिटीश दिडशे वर्षे राज्य कसे करू शकले ? आज रोजगाराच्या बाजारात मासिक फक्त ८ – १० हजाराच्या तुटपुंज्या पगारावर येथील पदवीधर नोकऱ्या करताहेत, ज्या बहुतांश सेवाक्षेत्रातील आहेत. यांचा पुस्तकी अभ्यास ना शेतीला उपयुक्त ना कारखान्यांमध्ये उपयोगी!

तिसरा नाशकारी उत्तर आशियाई अथवा युरोपीय घटक आम्ही स्विकारला तो राजा, राणी, राजकुमार व रॉयल परिवाराची ‘दास्यता’. चातुर्वर्ण्यव्यवस्थेनेच ही दास्यता आमच्यावर लादली. “सामूहिक सहकार” हा भारतीय गणराज्य पद्धतीचा आत्मा होता जो कठोरपणे नष्ट करण्यात आला. रॉयल परिवार व त्याच्या भाटांना इतके महत्त्व प्राप्त झाले की राजपरिवारातील अगदी कुक्कुले बाळसुद्धा जनतेसाठी वंदनीय ठरू लागले. (हीच ‘गुलामीची वंदना’ अनेक संस्थानिकांच्या नगरांमधील प्रजेमध्ये आजही दिसून येते.) राजा आणि त्याची चौकडी म्हणेल तोच कायदा व न्याय ठरू लागला. यामुळेच शंबूक या शूद्राची हत्या केली गेली किंवा द्रौपदीचे वस्त्रहरण भीष्म फक्त पहात राहिला. काही आदरणीय व जनतेचे कैवारी असणारे राजे होऊन गेले परंतु ते अपवादच. “सहकारी शेती” हे आमच्या सामाजिक बंधुत्वाचे मोठे वैशिष्ट्य होते. ही आमची व्यावसायिक ताकदही होती. आज मात्र आमच्या बळीराजाकडे दोन – चार एकराची शेती असते जी व्यावसायिक पद्धतीने करणे त्यांस एकट्याने जमत नाही. सामूहिक सहकारी शेतीला येथील जातीव्यवस्थेने नष्ट केले. अर्थात हे सर्व पाप पुन्हा चातुर्वर्ण्यव्यवस्थेचेच. वर्णपद्धतीतील अभिजनांच्या दिखाऊ व अनुत्पादक ज्ञानाने येथील बहुजनांच्या समाजोपयोगी ज्ञानाचा आदर व किंमत ही अत्यंत कमी ठरवली. जोषपूर्ण बोलण्याला आणि तशाच नौटंकीला महत्व मिळू लागले. खरे हिरो असणारे शेतकरी आणि कष्टकरी हे झाकोळले गेले. वर्णव्यवस्था इथे येण्यापूर्वी येथील गणांची लोकशाही पद्धत ही सामाजिक व कौटुंबिक समतेवर आधारित होती. स्थानिक गणराज्यांचे गणप्रमुख हे जसे पुरुष असायचे तसे स्रियासुद्धा हे नेतृत्व समर्थपणे पेलायच्या. लिंगभेद, वर्णभेद व जातीभेद नसणारा असा येथील समाज त्या काळातील परीमाणांनुसार प्रगल्भ होता.

चौथा हानीकारक घटक होता व आजही आहे तो साधनसामग्रीच्या किंवा एकूणच संपत्तीच्या मुठभरांच्या हातातील मालकीचा व नियंत्रणाचा. राजा, सरदार, उमराव, भांडवलदार, पुरोहित वर्ग, सरंजामदार, जमीनदार इत्यादींनी बहुतेक साधनांवरील व विकासाच्या संधींवरील आपले नियंत्रण अगदी चलाखीने व कठोरपणे हजारो वर्षे कायम ठेवले. आजच्या लोकशाही ढाच्यातही हेच अन्यायी नियंत्रण आम्ही आजही पाहतो, फक्त नावे किंवा पदे बदलली आहेत. लोकशाहीतील नव्या राजांना व उमरावांना मदत करणारे शक्तीशाली प्रशासकीय अधिकारी आज सरदारांच्या जागी आलेले आहेत जे “बलाढ्य उद्योगपती, राजकारणी व धर्माचार्यां”च्या पॉवरफुल त्रिकुटाला मदत करीत असतात. आर्थिक व प्रशासकीय जाण ही जवळपास नसल्यानेच भाबड्या जनतेला या त्रिकुटाची कुटील कार्यपद्धती कळत नाही. बरं, ती कळली तरी असंख्य जातींनी दुभंगलेली जनता एकत्र येऊन संघर्ष करत नाही. ती संघर्ष न करण्याचे मोठे कारण म्हणजे डोक्यात घट्ट बसवलेला एक मूर्ख समज – “आपल्याच पूर्वजन्मातील पापाचे हे भोग आहेत.” या समजाला बळकटी देण्यासाठी म्हणून चातुर्वर्ण्यव्यवस्थेने अनेक असे भंपक बाबा – बापू निर्माण करुन ठेवलेत जे मूर्ख जनतेला कर्मकांडांची अफू देत राहतात. खाजगीकरणाच्या राजमार्गाने या पॉवरफुल त्रिकुटाचे साधनसामग्री व संधींवरील नियंत्रण कमालीच्या वेगाने वाढत चालले आहे. मेंदू गहाण ठेवणाऱ्या मूर्ख जनतेला अर्थात ही व्यवस्था आजही नीटपणे कळलेली नाही. उदाहरणार्थ, एक बलाढ्य उद्योगपती हा सत्ताधीश व विरोधी राजकारण्यांना नेहमीच एकत्र ठेवत असतो. मूर्ख जनता मात्र यांच्या लुटुपुटीच्या राजकीय लढायांमध्ये रस घेत आपल्या दुर्दैवाचे दशावतार सहन करीत राहते. कल्पना करा, जगाच्या पाठीवर इतकी निर्बुद्ध जनता आणखी कुठे असेल ?

पाचवा नुकसानकारक घटक आहे ‘नियोजनाच्या अभावाचा’. ‘जिल्हाकेंद्रित अर्थव्यवस्थे’वर आम्ही समग्रपणे भर दिला नाही. सार्वजनिक साधनांचे आमचे नियोजन गंडलेले आहे. यांचेही खाजगीकरण वेगाने होत असल्याने १३० कोटी म्हणजे ९०% भारतीयांच्या प्रगतीत अडथळे उभे रहाताहेत. आपापल्या जिल्ह्यात व्यावसायिक शिक्षण, नोकरी अथवा व्यवसाय आणि सुयोग्य इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देता आले असते तर ठराविक भारतीय शहरांना सूज आली नसती.

सहाव्या विनाशकारी घटकाने आमच्या जवळपास सर्व सिस्टीम्स आणि संस्थांना पोखरुन ठेवले आहे. हा सहावा भयंकर घटक आहे सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराचा. यातही आर्थिक भ्रष्टाचाराने येथील ९०% जनतेला अगदी हवालदिल केले आहे. भ्रष्टाचाराबाबतचे आमचे आंतरराष्ट्रीय मानांकन अगदी लाजिरवाणे आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की सामान्य जनतेने भ्रष्टाचाराला सर्व क्षेत्रांमध्ये स्विकारले आहे. “राजकारणी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पैसे खावेत पण थोडे कामही करावे”, इतक्या क्षुल्लक अपेक्षेवर जनता आज जगते आहे. अर्थात सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारांचे उगमस्थान हे “वैचारिक भ्रष्टाचारा”त आहे. जनता आपले सामूहिक सत्व विसरुन गेली आहे. साधनसामग्री व संधींवरील वर नमूद केलेल्या त्रिकुटाच्या अमानवी नियंत्रणामुळे हा भ्रष्टाचार फोफावत गेला आहे. उद्याच्या पिढ्यांसाठी वाढत्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या संस्था व सिस्टीम्स आम्ही आज बाळगतो व पोसतो आहोत. आमच्या संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत की आम्ही “भ्रष्टाचार हाच शिष्टाचार आहे” हे मनोमनी मान्य केले आहे. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई आम्ही सामूहिकरित्या लढू शकत नाही कारण आमच्या जगण्याच्या तत्वज्ञानाचा गाभा हाच आज भ्रष्ट झालेला आहे. “युरोपीय रिनाईसंस” सारखा संपूर्ण बदल आम्हाला घडवावा लागेल व यासाठी आमच्या तत्वज्ञानाचे नीतीशास्रावर आधारित असे पुनर्लेखन करावे लागेल. लोकांमधे रुतलेला न्यूनगंड व त्यामुळे बनलेली पराभूत वृत्ती नष्ट करुन लोकांना हे सोदाहरण दाखवून द्यावे लागेल की या सहा रोगांना आपण समूळ नष्ट करु शकतो. हा बदलाबद्दलचा विश्वास एकदा निर्माण झाला की जनताच सामूहिक परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होईल !

  • डॉ. गिरीश जाखोटिया

ईमेल – girishjakhotiya@gmail.com

Copyright ©jakhotiya.com
Right to change/reproduce withheld, IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.