MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

NEWS

मेट्रोची गर्दी कमी करण्यासाठी एमएमआरडीए नेमणार अभ्यास गट

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर (Versova-Andheri- Ghatkopar) मेट्रो मार्ग १(Metro Line-1) वरील वाहतूक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्याकरिता मार्ग सुचवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) MMRDA एक उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहे. एमएमआरडीएने जारी केलेल्या निवेदनात त्यांनी ही घोषणा केली आहे.

७ जुलै रोजी सकाळी गर्दीच्या वेळी घाटकोपर आणि अंधेरी सारख्या प्रमुख स्थानकांवर एका ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रचंड गर्दी झाली होती.

या निवेदनात एमएमआरडीएने म्हटले आहे की, मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) द्वारे चालवल्या जाणाऱ्या मेट्रो मार्ग १ मध्ये वारंवार होणाऱ्या अडथळ्यांची त्यांना जाणीव आहे. एक जबाबदार प्राधिकरण म्हणून, एमएमआरडीए यावर देखील गांभीर्याने विचार करत आहे. माजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील एक उच्चस्तरीय समिती तात्काळ स्थापन केली जाईल. एमएमआरडीए तात्काळ निराकरण करण्यासाठी आणि सुरळीत आणि आरामदायी प्रवास अनुभव देण्यासाठी ऑपरेटरशी संपर्क साधेल,” असे प्राधिकरणाने म्हटले आहे.

ही समिती सेवांमध्ये वारंवार होणाऱ्या व्यत्ययांची कारणे आणि गर्दी हाताळण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेईल, विशेषतः घाटकोपर येथे, जे मेट्रो लाईन १ आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रणालीमधील एक प्रमुख इंटरचेंज आहे. ही समिती व्यत्ययाच्या बाबतीत आपत्कालीन प्रतिसाद प्रणालींच्या कामगिरीचे मूल्यांकन देखील करेल. गर्दीच्या काळात क्षमता वाढविण्यासाठी आणि दबाव कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजनांचा अभ्यास करेल.

सोमवारी सकाळी, वर्सोवाला जाणाऱ्या एका मेट्रो ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. आझाद नगर स्टेशन वर हा बिघाड झाल्याने सादर मेट्रो ट्रेन दुरुस्तीसाठी डेपोमध्ये नेण्यात आली. यामुळे प्रवासाची एक फेरी रद्द करण्यात आली. परिणामी घाटकोपर येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. सुमारे ५०० लोक स्टेशनबाहेर वाट पाहत होते. ४५ मिनिटांच्या विलंबानंतर सेवा सुरू झाल्या.

या घटनेनंतर, मेट्रो प्रशासनाने सांगितले की त्यांनी रद्द केलेल्या सेवांची भरपाई करण्यासाठी स्टँडबाय ट्रेन तैनात केल्या आहेत. एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी सांगितले की ते नवीन समितीच्या शिफारशींच्या परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवतील आणि आवश्यक बदल अंमलात आणण्यासाठी मेट्रो प्रशासनाशी समन्वय साधतील.