अंधेरी – मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. प्रभाग क्र. 75(Ward No.75) मध्ये तिरंगी लढत होत आहे. या प्रभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (UBT), भारतीय जनता पक्ष (BJP) आणि कॉँग्रेस (Congress) यांच्यात थेट लढत होत आहे.
प्रभाग क्र. 75 म्हणजे मरोळ(Marol)-विजयनगर -भवानी नगरचा परिसर. या प्रभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे पुन्हा एकदा आपले नशीब आजमावणार आहेत. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार ऋतुजा रमेश लटके (Rutuja Latke) यांचा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल (MLA Murji Patel) यांनी पराभव केला. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर(MP Ravindra Waykar) हे निवडून आले. त्यामुळे अंधेरीवर(Andheri) सध्यातरी शिंदे गटाचे(Eknath Shinde) प्राबल्य दिसून येते. त्यामुळे यावेळी सावंत यांना यंदाची महापालिका निवडणूक (BMC Election) वाटते तितकी सोपी राहिलेली नाही.
भाजपाने(BJP) यावेळेस पुन्हा एकदा निष्ठावंत कार्यकर्ते उमेश राणे(Umesh Rane) यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांना जिंकून आणण्यासाठी आमदार मुरजी पटेल यांनी चांगलीच कंबर कसलेली दिसून आली. त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अंधेरी कार्यकारिणीस भगदाड पाडले. मनसेचे(MNS) तत्कालिन अंधेरी विभाग अध्यक्ष रोहन सावंत आणि त्यांचे शाखा अध्यक्ष यांना आमदार पटेल यांनी शिंदे गटामध्ये आणले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार(NCP) पक्षाचे मुंबईचे नेते अशोक देसाई, शिवनाथ खैरनार यांना भाजपामध्ये आणले. या पक्षप्रवेशामुळे उमेश राणे यांचे प्राबल्य वाढलेले दिसून येत आहे.
या तिरंगी लढतीमध्ये तिसरं नाव आहे कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार इमरान शेख यांचे. बोहरी कॉलनी, भंडारवाडा आणि मापखान नगर या भागात मुस्लिम मतदारांचे प्राबल्य आहे. या भागातून इमरान शेख(Imran Shaikh) यांना भरघोस मतदानाची अपेक्षा आहे. तसेच इमरान शेख यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर(Adv. Prakash Ambedkar) यांनी सभा घेतल्याने आपल्याला दलित बांधवांची मते मोठ्या प्रमाणावर मिळतील असा आशावाद शेख व्यक्त करत आहेत.
अन्य उमेदवारांमध्ये उत्तर भारतीय विकास सेना (UBVS)चे विपिन कुमार आष्टा, बहुजन मुक्ती पार्टी (BMP)चे विनायक संभाजी सूर्यवंशी, अपक्ष उमेदवार सुरेशनाथ तिवारी आणि दिनेश राणा प्रताप सिंग यांचा समावेश आहे.
प्रभाग क्र. 75 मध्ये एकूण मतदारांचीसंख्या 60,166 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातींची मते 2,618 इतकी आहेत. तर अनुसूचित जमातीची मते 678 एवढी आहेत.
मरोळकर आपला नगरसेवक कोणाला निवडतात हे पाहणे औत्सुकयाचे ठरेल.
