Versova Police Station

मुंबई: मुलीला मेडिकल कॉलेजमध्ये (Medical College) जागा देण्याचे आमिष दाखवून वर्सोवा (Versova) परिसरातील एका ५१ वर्षीय महिलेची ४५ लाख रुपयांची फसवणूक(Fraud) करण्यात आली. वर्सोवा पोलिसांनी आरोपी मेघना संतोष सातपुतेला अटक केली आहे, तर इतर तीन जण – नितेश पवार, राकेश गावडे आणि ‘सावंत काका’ म्हणून ओळखला जाणारा एक माणूस – सध्या फरार आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार संजना गोंधळे ही अंधेरी येथील रहिवासी आहे आणि एका खासगी दवाखान्यामध्ये वैद्यकीय सहाय्यक आहे. त्यांच्या लहान मुलीने नीट (NEET) परीक्षेत ३१५ गुण मिळवले होते. तिच्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता.

यादरम्यान, संजना गोंधळे यांंनी त्यांच्या ओळखीच्या मेघना सातपुतेशी संपर्क साधला. आपण सिंधुदुर्गमधील वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यामध्ये प्रवेश मिळवून देऊ शकतो असा दावा मेघनाने केला.

आरोपींनी महाविद्यालयाचे विश्वस्त असल्याचे भासवले. गोंधळे यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपण माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांचे नातेवाईक असल्याचा दावाही केला. त्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवून, गोंधळे यांनी काही कालावधीत एनईएफटी आणि रोख रकमेद्वारे ४५ लाख रुपये पाठवले.

तथापि, जेव्हा महाविद्यालयीन प्रवेशाचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही तेव्हा गोंधळे यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. आरोपीने संजना यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्व संपर्क बंद केले.

पोलीस तपासात असे दिसून आले की आरोपीचा सदर वैद्यकीय महाविद्यालयाशी कोणताही संबंध नव्हता. तक्रारीनंतर मेघना सातपुते यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस आता इतर तीन आरोपींचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे, असे फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तांत म्हटले आहे.