Valentine Day

वांद्रे – १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रसी (सीपीडी) यांच्या माध्यमातून पाचवा व्हॅलेंटाईन डे उत्साह, बांधिलकी आणि लोकशाही मूल्यांच्या जाणीवेने साजरा करण्यात आला.

सध्या समाजात जात, धर्म, लिंग, प्रांत, भाषा, खानपान आणि पेहराव यांच्या नावावर द्वेष पसरविण्याचे प्रकार वाढत असताना, समुद्रकिनारी खुले आकाशाखाली प्रेम, मैत्री आणि मानवतेचे बीज पेरण्याची जबाबदारी सीपीडीने गेली पाच वर्षे सातत्याने स्वीकारली आहे. हा उपक्रम केवळ उत्सव नसून सार्वजनिक जागा लोकशाही अभिव्यक्तीसाठी पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न आहे.

गेल्या पाच वर्षांप्रमाणे यंदाही समुद्रकिनारी खुल्या जागेत, बैंड स्टैंड बांद्रा येथे कार्यक्रम आयोजित केला गेला. कार्यक्रमात प्रेम आणि मैत्री विषयक शायरी, गीते, तसेच नुक्कड नाटक सादर करण्यात आले. उपस्थित सहभागीनीही उत्स्फूर्तपणे गीते सादर करून सहभाग नोंदवला. सर्वांना सिपिडीने तयार केलेली “व्हॅलेंटाईन डे प्रतिज्ञा” वितरित करण्यात आली. एका ज्येष्ठ नागरिकांनी ही प्रतिज्ञा वाचून आनंद व्यक्त केला आणि सुमारे २५–३० सहभागींसाठी कॉफी देऊन कार्यक्रमाचा गौरव केला.

प्रेम, मैत्री आणि मानवतेचा संदेश निर्भीडपणे मांडणाऱ्या सहभागींचा सन्मान म्हणून त्यांना भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचा टेबल स्टँड भेट देण्यात आला. शेवटी केक कापून “दोस्ती जिंदाबाद”, “तू जिंदा है” आणि “दबे पैरोंसे उजाला आरहा है” यांसारख्या सामाजिक परिवर्तन व मानवमुक्तीच्या गीतांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

WhatsApp Image 2026 02 15 At 18.42.04 1024x768

गेल्या पाच वर्षांच्या अनुभवातून सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रसी (सीपीडी) चे समन्वयक विशाल जाधव यांनी सर्व मित्र संघटना, संस्था आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले की, बंद सभागृहांच्या मर्यादेपलीकडे जाऊन पुन्हा एकदा खुल्या मैदानात, सार्वजनिक ठिकाणी लोकांबरोबर संवाद साधण्याची संस्कृती जोपासली पाहिजे. सार्वजनिक जागा लोकशाही अभिव्यक्तीसाठी पुन्हा मिळवणे अत्यावश्यक आहे. अन्यथा आपली अभिव्यक्ती केवळ संविधानाच्या पानांपुरती मर्यादित राहील.