विरार: विरार येथील विवा महाविद्यालयाच्या बीएमएएमसी (Bachelor of Arts in Multimedia and Mass Communication) विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जाहिराती संकल्पनेवर आधारित “एक्सप्रेशन ” वार्षिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला. या कार्यक्रमाला माननीय माजी आमदार क्षितीज हितेंद्र ठाकूर यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाला विभागाचे माजी विद्यार्थी जाहिराती तज्ञ चिराग यादव , स्मित के., नुमान खतीब, अभिनेत्री रेवथी अय्यर, प्राध्यापिका क्षितिजा पालव परीक्षक म्हणून लाभले.
यंदाचा आंतर महाविद्यालयीन एक्सप्रेशन कार्यक्रम जाहिरातीतील विनोदी अपीलचा वापर करून जाहिराती सादर करणे या संकल्पनेवर आधारित होता. विद्यार्थ्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला व्यासपीठ देणे, माध्यम क्षेत्रातील विविध कौशल्यांना चालना देणे आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमात प्रिंट जाहिराती, रेडिओ जाहिराती, टेलिव्हिजन कमर्शिअल जाहिराती, शार्क टँक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि सर्जनशीलतेचा प्रभावीपणे आविष्कार सादर केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बीएएमएमसी विभागप्रमुख व समन्वयक प्राध्यापकांनी नियोजनबद्ध मार्गदर्शन केले. विभागातील सर्व प्राध्यापकवर्ग व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी नियोजन, नोंदणी, मंच व्यवस्थापन आणि सहभागींच्या मार्गदर्शनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि वेळेत पार पडला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना व विभागाला गौरवचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले.
विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ . प्राजक्ता परांजपे,आयक्यूएसी समन्वयक डॉ. रोहन गव्हाणकर, सह समन्वयक डॉ. अनुश्री किनी , बीएएमएमसी विभाग प्रमुख शाहीन महिडा, अन्य मान्यवर यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला टायटल स्पॉन्सर उमंग कन्स्ट्रक्शन, ट्रॉफी स्पॉन्सर अर्चित कन्स्ट्रक्शन, फूड स्पॉन्सर बर्गर किंग हे प्रायोजक म्हणून लाभले होते. कार्यक्रमात आयोजित विविध स्पर्धेत बेस्ट डिपार्टमेंट ट्रॉफी पटकवण्याचा मान आयटी सीएस डीएस विभागाला मिळाला.
