अंधेरी: मुंबईच्या लोकल रेल्वे प्रवासादरम्यान हरवलेली तब्बल ११ लाख रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग अंधेरी रेल्वे पोलिसांनी शोधून तिच्या मालकाकडे सुखरूप परत दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रामाणिक आणि तत्पर कारवाईमुळे अंधेरी रेल्वे पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात रेल्वे पोलिसांच्या गस्ती दरम्यान एक पांढऱ्या रंगाची लेदर बॅग बेवारस अवस्थेत आढळून आली. संशयास्पद वस्तू असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ बॅग ताब्यात घेतली आणि तपासणी केली.

तपासादरम्यान त्या बॅगमध्ये महागडे डिजिटल कॅमेरा साहित्य, सोन्याचे दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू मिळून सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तत्काळ मालकाचा शोध सुरू केला. चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ही बॅग करण शाह या प्रवाशाची असल्याचे निष्पन्न झाले.

रेल्वे पोलिसांनी आवश्यक ओळख पटवून संपूर्ण मुद्देमाल करन शाह यांच्याकडे सुपूर्द केला. अचानक हरवलेली मौल्यवान बॅग परत मिळाल्याने शाह यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले, असे टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.

मुंबईच्या गजबजलेल्या लोकल प्रवासात अशा घटना वारंवार घडत असल्या तरी अंधेरी रेल्वे पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि प्रामाणिकपणा यामुळे प्रवाशांचा रेल्वे प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Andheri Railway Police, Mumbai Local, Railway Police, Bag missing case, Churchgate-Andheri Local, Indian Railway

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *