फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात मैत्री, धमाल आणि नॉस्टॅलजियाची मसालेदार ट्रीट घेऊन येणाऱ्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाचं धमाकेदार टायटल साँग प्रदर्शित झालं आहे. ‘मामाच्या गावाला जाऊया’ या बडबडगीताच्या चालीवर ठेका धरायला लावणारं हे गीतही तुम्हाला नॉस्टॅलजिक करणारं आहे. शब्दांनीच तुम्हाला गोव्याच्या माहोलची सफर घडवणाऱ्या या गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायकही अवधूत गुप्ते आहेत. त्यांच्या युथफुल एनर्जिटीक आवाजाने आणि संगीताने त्यांनी या गाण्याला अल्टिमेट पार्टी आणि मस्ती साँगचा बाज दिला आहे.

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकारांनी केलेली धमाल पाहून हा चित्रपटही भन्नाट असेल अशी चर्चा सध्या रंगली आहे. त्यात या चित्रपटाचे टायटल साँग आऊट झाल्यामुळे चित्रपटाच्या रिलिजची उत्सुकता आणखी वाढली आहे.

या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, ”हे गाणं गातानाच मला त्याची भन्नाट एनर्जी जाणवत होती. प्रत्येक बीटमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. खूप दिवसांनी इतकं मस्त, फुल ऑन हॅपनिंग आणि मूड फ्रेश करणारे गाणं करायला मिळालं. गोव्याची मजा, दोस्तीची धमाल आणि तरुणाईचा जोश या गाण्यात भरभरून आहे. हे गाणं लोकांच्या प्लेलिस्टमध्येच नाही तर त्यांच्या ट्रिप प्लॅनमध्येही जागा बनवेल.”

दिग्दर्शक विजू माने म्हणतात, ”’मामाच्या गोव्याला जाऊया’चं टायटल साँग हे फक्त गाणं नाही, तर एक भन्नाट अनुभव आहे. गोव्याची मस्ती, मित्रांची धमाल आणि आयुष्य एन्जॉय करण्याचा फील या गाण्यातून आम्ही पकडण्याचा प्रयत्न केला आहे. हे गाणं ऐकल्यावर आणि पाहिल्यावर कोणालाही आपल्या मित्रांना फोन करून ‘चल गोव्याला जाऊया’ असंच वाटेल. प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यासाठी सध्या हे गाणं एआयच्या दृश्यातून समोर आणले असून मूळ दृश्य यापेक्षा कमाल असणार आहे. प्रेक्षकांना हे गाणं अक्षरशः वेड लावेल याची मला खात्री आहे.’’

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाचं टायटल साँग म्हणजे अक्षरशः धमाका आहे! गाण्यातील भन्नाट बीट्स, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांची झिंग आणणारी दृश्यं आणि अवधूत गुप्ते यांच्या आवाजाची जादू यामुळे हे गाणं एकदम हॅपनिंग वाइब्स देणारं ठरत आहे. दरम्यान विजुमेनिया प्रा. लि. आणि लाईट अँड शेड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. तर पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांचे आहेत. तर या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण आणि संतोष जुवेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात म्हणजेच ३१ जुलै रोजी मित्रांनी मित्रांसाठी आणलेली ही जबरदस्त ट्रीट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *