विरार, १० जुलै — विवा महाविद्यालयाचे यंदाचे वर्ष हे रौप्य महोत्सवी वर्षी आहे. विवा महाविद्यालय हि फक्त एक शैक्षणिक संस्था नसून पालघर जिल्ह्यातील आजच्या घडीला गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारे, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे, उद्योजक निर्माण करणारे, विविध व्यवसायिक अभ्यासक्रम शिकवणारे नामांकित महाविद्यालय आहे.
विवा महाविद्यालय आणि द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस् ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार क्षितीज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच गुरू पौर्णिमा दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमांतर्गत “अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया” या अनोख्या आणि ऐतिहासिक संग्रहालयाचे भव्य उद्घाटन विवा महाविद्यालयात पार पडले.
या आगळ्यावेगळ्या म्युझियमचे उद्घाटन आयसीए संस्थेचे पदाधिकारी मा. श्री. केतन साईया ( चेअरमन, डबल्यू आईआर सी) यांच्या शुभहस्ते व दया बंसाल (ब्रांच चेअरपर्सन) , जीवन सावला (सेक्रेटरी, डबल्यू आईआर सी) ,स्वेता जैन ( आरसीएम ब्रांच, नॉमिनी, ) , विजेंद्र जैन ( , आरसीएम ब्रांच, नॉमिनी) अशोक कुमावत ( ब्रांच, ट्रेजर), सुमित लखोटीआ ( ब्रांच विकासा चेअरमन), ज्येष्ठ सदस्य भरत, राजेश , विवा चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य श्रीनिवास पाध्ये यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या उद्घाटनावेळी विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, आयसीए संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयांतील प्राध्यापक- विद्यार्थी वर्ग इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
“अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया” हे अकाउंटिंग क्षेत्रावर आधारित संग्रहालय असून त्यात लेखा पद्धतीचा ऐतिहासिक प्रवास, जुन्या लेखा उपकरणांचे प्रतिरूप, ऐतिहासिक दस्तऐवज, भारतीय आणि पाश्चिमात्य लेखा प्रणालींचा विकास, तसेच आधुनिक डिजिटल अकाउंटिंगचे दर्शन घडविण्यात आले आहे.
याप्रसंगी “शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते न राहता अनुभवाधिष्ठित आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून समृद्ध असायला हवे. अकाउंटिंग म्युझियम विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच देणार नाही, तर प्रेरणाही देईल. असे मत उपस्थित पाहुण्यांनी मांडले “





