अंधेरी- महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला(Maharashtra Navnirman Sena) शिंदेंच्या शिवसेनेने (Shivsena) मोठा धक्का दिला आहे. मनसेचे अंधेरी माजी विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. रोहन सावंत यांच्यासह अंधेरीतील विभाग सचिव, उपविभाग सचिव यांच्यासह शाखाध्यक्ष, शाखा सचिव, महिला शाखाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश केला. रोहन सावंत यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मनसेला मोठे खिंडार पडले आहे. अंधेरीचे (Andheri) आमदार मुरजी पटेल (MLA Murji Patel) यांनी या पक्षप्रवेशासाठी मोठी भूमिका बजावल्याची चर्चा आहे.

शिवसेना पक्षात मनसे अंधेरी विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांच्यासह विभाग सचिव विजय पोमेंडकर,दिलीप जाधव उपविभाग सचिव (प्रभाग क्र. ७६/८१), समीर सावंत शाखा अध्यक्ष (प्रभाग क्र. ८०), आनंद मोरे शाखा अध्यक्ष (प्रभाग क्र. १२१), दिलीप चव्हाण शाखा अध्यक्ष (प्रभाग क्र. ७५), तुषार रजपूत शाखाध्यक्ष (प्रभाग क्र. ८१), कुसुम गायकवाड शाखाध्यक्ष (प्रभाग क्र. ७६), पूजा हळदणकर शाखाध्यक्ष (प्रभाग क्र. ८१), विद्या भालेराव शाखाध्यक्ष (प्रभाग क्र. ७५), लीला सिंग शाखाध्यक्ष (प्रभाग क्र. ८६), फरीद शेख शाखा सचिव (प्रभाग क्र. ७६), प्रकाश चव्हाण शाखा सचिव (प्रभाग क्र. ७५), रमेश गावकर शाखा सचिव (प्रभाग क्र. १२१), नितीन कांबळे केबल उपविभाग संघटक यांच्यासह अनेक उपशाखाध्यक्ष व गटाध्यक्ष यांनी जाहीर प्रवेश केला.

नोव्हेंबर महिन्यात मनसे अंधेरी विधानसभा विभाग अध्यक्षपदी रविंद्र इंदुलकर यांची निवड करण्यात आली होती. या नेमणुकीमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. रोहन सावंत हे मरोळचे स्थानिक रहिवाशी गेल्या वीस वर्षांपासून राज ठाकरे यांच्या सोबत भारतीय विद्यार्थी सेनेपासून कार्यरत आहेत. अंधेरी मधील कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता इंदुलकर यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे मनसे कार्यकर्त्यांत नाराजी पसरली होती. अखेर या नाराजीचे रूपांतर शिवसेना पक्षप्रवेशात झाले.
या पक्षप्रवेशाचे शिल्पकार आमदार मुरजी पटेल आहेत असे म्हटले जाते. ठाणे येथे बुधवारी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री रोहन सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रोहन सावंत यांच्या हाती भगवा ध्वज दिला. याप्रसंगी आमदार मुरजी पटेल उपस्थित होते.
