अंधेरी- शनिवारी दुपारी अंधेरीतील एमआयडीसी(Andheri MIDC) परिसरात रासायनिक गळती झाल्यानंतर विषारी धुरामुळे एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आणि इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अहमद हुसेन (२०) असे मृताचे नाव आहे. तो एका दागिन्यांच्या वर्कशॉपमध्ये काम करत होता जिथे तो कचरा हाताळत होता.
पोलिसांनी सांगितले की, हुसेन पाण्यात सोडियम सल्फेट मिसळून कचरा साफ करत होता. त्या दरम्यान दुपारी ४.५५ वाजता भांगरवाडी येथील एका दुमजली इमारतीत ही घटना घडली.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हुसेनने चुकून जास्त प्रमाणात सोडियम सल्फेट मिसळले, ज्यामुळे वायू बाहेर पडला. हा वायू श्वसनावाटे फुफ्फुसात गेल्यामुळे हुसेन खाली कोसळला. हुसेनचा आवाज ऐकून त्याची बहीण सबा शेख (१७) आणि शेजारी नौशाद अन्सारी (२८) आत धावले. श्वसनावाटे धूर त्यांच्यादेखील शरीरात गेला.
सदर ठिकाणी खोलीबाहेर असलेल्या हुसेनच्या वडिलांना तिघेही बेशुद्ध पडलेले आढळले. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांच्या मदतीने पीडितांना होली स्पिरिट रुग्णालयात (Holy spirit hospital) नेण्यात आले. हुसेन यास पोहोचताच मृत घोषित करण्यात आले, तर सबा आणि अन्सारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे.
“आम्ही घटनेची नोंद केली असून चौकशी सुरू आहे,” असे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे(MIDC Police station) वरिष्ठ निरीक्षक रवींद्र वाणी म्हणाले असल्याचे दी इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तांत म्हटले आहे.
Photo courtesy – The Indian Express
