वाशी : आयसीएलईएस’ मोतीलाल झुनझुनवाला कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, वाशी येथे १९ नोव्हेंबर रोजी माजी विद्यार्थी सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नौदलाचे व्हाइस ॲडमिरल दीपक कुमार गोस्वामी (बॅच १९८३–८५) व डॉ. कविता गोस्वामी (बॅच १९८२–८४) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

प्राचार्य प्रा. (डॉ.) अनीता गोस्वामी–गिरी यांनी अतिथींचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व गणेश वंदनेने झाली. आपल्या मनोगतात प्राचार्यांनी सांगितले की माजी विद्यार्थी हे संस्थेचा वारसा असून त्यांचा सहभाग संस्थेचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य अधिक प्रबळ करतो.

यानंतर व्हाइस ॲडमिरल दीपक गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी जीवनापासून भारतीय नौदलातील प्रतिष्ठित पदापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी शब्दांत मांडला. शिस्त, प्रामाणिकपणा, मेहनत, संवेदनशीलता व चारित्र्य ही व्यक्तिमत्त्व घडवणारी महत्त्वाची मूल्ये आहेत, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमानंतर दोन्ही माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील प्रयोगशाळा, प्रशासकीय कार्यालय, वाचनालय, जिमखाना व एनएसएस कक्ष यांना भेट देऊन महाविद्यालयातील सकारात्मक बदलाबाबत समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाला १५२ विद्यार्थी, १७ शिक्षक तसेच सर्व बिगरशिक्षक कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.