Kukdu Ku From Super Duperr Marathi 2026 1

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या ‘सुपर डुपर’ या आगामी चित्रपटातील आणखी एक धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘कुकडू कू’ असे भन्नाट बोल असलेलं हे गाणं नावाप्रमाणेच जबरदस्त ऊर्जा, मजा आणि गोंधळाचा तडका घेऊन आलं आहे.

समीर आशा पाटील यांचे बोल लाभलेले, अभिनय जगताप यांच्या जोशपूर्ण संगीताने सजलेलं हे गाणं अंशुमन मोरे आणि लहान मुलांच्या आवाजात साकारलं असून ऐकतानाच प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडतं. पारंपरिक आणि आधुनिक कुटुंब यांच्यातील मजेशीर संघर्ष आणि जुगलबंदी या गाण्यातून रंगतदार पद्धतीने उलगडते. गाण्यातील सिच्युएशन, रंगतदार मांडणी आणि भन्नाट कोरिओग्राफी यामुळे ‘कुकडू कू’ हे गाणं ऐकण्याबरोरच पाहाण्यासाठीही एक व्हिज्युअल ट्रीट ठरतं आहे.

चित्रपटाच्या कथानकातील ‘गोंधळ’ हा महत्त्वाचा भाग या गाण्यातून प्रभावीपणे समोर येतो. दोन भिन्न विचारसरणीच्या कुटुंबांची टक्कर, त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग आणि उत्साहपूर्ण वातावरण यामुळे गाणं अधिकच एंटरटेनिंग बनलं आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या परफॉर्मन्समधून गाण्याला वेगळीच उंची दिली आहे.

या गाण्याबद्दल दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात, “हे गाणं आमच्या ‘सुपर डुपर’ चित्रपटाचा खरा उर्जाबिंदू आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. या गाण्यामुळे मोठ्यांसह लहानग्यांनाही उन्हाळ्याच्या सुट्टीत हा चित्रपट पाहाताना धमाल येईल आणि हे गाणं एका लहान मुलाकडून गाऊन घेण्याचे हेच कारण होते. एक गोष्ट मी इथे आवर्जून सांगेन, हे गाणं ज्या अंशुमनने गायलं आहे, तो जळगावमधील अत्यंत साध्या घरातील मुलगा आहे आणि त्याने त्याच्या पदार्पणातच अतिशय जबरदस्त गाणे मराठी सिनेसृष्टीला दिले आहे. मला खात्री आहे की, हे गाणं चित्रपटगृहात प्रेक्षकांना खुर्चीत बसू देणार नाही, ते नक्कीच या उत्साहात आणि जल्लोषात सामील होतील.”

झी स्टुडिओजची प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स यांच्या निर्मितीतून साकारलेला ‘सुपर डुपर’ हा कौटुंबिक मनोरंजनाचा महासोहळा येत्या ३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार बघता यावा अशा धमाल चित्रपटात निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘सुपर डुपर‘ या चित्रपटाचे विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता असून छायांकन संजय जाधव यांनी केले आहे.