अंधेरी- अंधेरी पूर्व येथील रेल्वे आरक्षण कार्यालयात सोमवारी संध्याकाळी प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) दालनाजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली.
ही घटना संध्याकाळी सुमारे ६:२० वाजता घडली, ज्यामुळे तिकीट बुकिंग कार्यालयामध्ये मध्ये उपस्थित कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये काही काळासाठी घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ अग्निशामक यंत्रांचा वापर करून आग विझवली.
संध्याकाळी ६:३५ पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. त्यामुळे सदर आग कार्यालयाच्या इतर भागांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात आली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी घटनेनंतर लगेचच घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासानुसार, वीजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. पोलीस अधिक तपास करत आहेत, असे मिड-डे च्या वृत्तात म्हटले आहे.
