प्रत्यक्षात स्ट्रोक आल्याचे झाले निदान
मुंबई : अंधेरीतील ७० वर्षीय व्यक्तीवर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात संबंधित व्यक्ती मद्याच्या नशेत नसून त्यांना स्ट्रोक आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे त्यांना वैद्यकीय उपचार मिळण्यास झालेल्या विलंबाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शरद कदम यांच्यावर २५ जुलै रोजी वर्सोवा पोलिसांनी कारवाई केली. अंधेरीतील सेव्हन बंगलोज परिसरात त्यांच्या वॅगनआरचा एका महिला पशुवैद्यकाच्या थार एसयूव्हीला तसेच अन्य एका कारला किरकोळ धक्का लागल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर कदम यांना वर्सोवा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मद्यपान करून वाहन चालवले होते का, हे तपासण्यासाठी वाहतूक पोलिसांना बोलावण्यात आले. मात्र, अनेक प्रयत्न करूनही कदम यांना ब्रेथलायझरमध्ये फुंकर मारता आली नाही. त्यानंतर वाहतूक पोलिस कर्मचारी अहवाल नोंदवता तेथून निघून गेले.
दरम्यान, कदम यांची प्रकृती बिघडलेली दिसत असतानाही ते काही तास पोलीस ठाण्यातच होते. सुरुवातीला ते मद्याच्या प्रभावाखाली असल्याचा प्राथमिक अंदाज घेऊन त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार मद्यधुंद वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नंतर एका दूरच्या नातेवाईकाच्या लक्षात कदम यांची प्रकृती अधिक खालावल्याचे आल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. कूपर रुग्णालयात रात्री सुमारे ९.३० वाजता करण्यात आलेल्या CT स्कॅनमध्ये त्यांना किरकोळ स्ट्रोक आल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेनंतर पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. एसीपी ज्ञानेश्वर आवारी यांच्या चौकशीत कदम मद्याच्या प्रभावाखाली नसल्याचे निष्पन्न झाले, तसेच ब्रेथलायझर चाचणीसाठी बोलावण्यात आलेल्या दोन वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांचेही जबाब नोंदवण्यात आले असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.
टीप: सदर फोटो एआय निर्मित आहे
