अंधेरी : तब्बल ३८ वर्षांपूर्वी घडलेल्या विलास भोसले हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने फरार आरोपी शामकुमार रामचंद्र शर्मा यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीविरोधात ठोस आणि विश्वासार्ह पुरावे सादर करण्यात अभियोजन पक्ष अपयशी ठरल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण आर. नवंदर यांनी १९८८ मधील या गाजलेल्या प्रकरणाचा निकाल देताना, “संशय कितीही गंभीर असला तरी तो कायदेशीर पुराव्याची जागा घेऊ शकत नाही,” असे निरीक्षण नोंदवले.

अभियोजन पक्षाच्या माहितीनुसार, ९ जून १९८८ रोजी अंधेरी पूर्व येथील कामगार कल्याण केंद्राजवळ विलास भोसले यांच्यावर तलवारी, कोयते आणि गुप्ती घेऊन आलेल्या सात ते आठ जणांनी हल्ला केला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना कूपर रुग्णालय येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शर्मा हे खटल्यादरम्यान फरार झाल्याने न्यायालयाने त्यांना पूर्वीच घोषित फरार आरोपी ठरवले होते. अनेक वर्षे त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत त्यांच्या अनुपस्थितीतच सुनावणी सुरू ठेवण्यात आली होती. त्यांच्या बाजूने मांडणी करण्यासाठी न्यायालयाने कायदेशीर मदत वकीलही नियुक्त केला होता.

या प्रकरणातील सहआरोपी खेमा पूरण सिंग, गुलाब पूरण सिंग आणि संजय सखाराम निर्मल यांची यापूर्वी २००३ मध्ये निर्दोष मुक्तता झाली होती, तर आणखी एका आरोपीचा मृत्यू झाला होता.

न्यायालयाने नमूद केले की, शर्मा यांना थेट गुन्ह्याशी जोडणारा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अभियोजन पक्ष सादर करू शकला नाही. संपूर्ण खटला मुख्यतः एका पोलीस हवालदाराच्या साक्षीवर आधारित होता. त्या हवालदाराने हल्ल्यापूर्वी काही व्यक्ती भोसले यांचा पाठलाग करत असल्याचे पाहिल्याचा दावा केला होता.

ओळख परेड प्रक्रियेतही गंभीर त्रुटी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ओळख परेड घेतल्याचा दावा करण्यात आला असला तरी ती प्रक्रिया पार पाडणाऱ्या अधिकाऱ्याची साक्ष नोंदवण्यात आली नव्हती. त्यामुळे ओळख प्रक्रियेची निष्पक्षता आणि विश्वासार्हता सिद्ध होऊ शकली नाही.

घटना रात्री घडली होती आणि त्यात अनेक जण सहभागी होते. इतक्या वर्षांनंतर करण्यात आलेली ओळख विश्वासार्ह मानता येत नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. “चुकीची ओळख होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

तसेच, कथित रक्तरंजित कपड्यांच्या जप्तीला पंच साक्षीदाराने दुजोरा दिला नाही. हत्येत वापरल्याचा दावा करण्यात आलेली शस्त्रेही पोलिसांकडे उपलब्ध नसल्याने ती न्यायालयात सादर करण्यात आली नाहीत.

पुराव्यांतील त्रुटींचा उल्लेख करत न्यायालयाने म्हटले की, “प्रत्यक्षदर्शी साक्ष नाही, शस्त्र जप्तीचा ठोस पुरावा नाही, विश्वसनीय ओळख परेड नाही आणि स्वतंत्र पुष्टी देणारे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.”

यामुळे न्यायालयाने संशयाचा फायदा देत शर्मा यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली, असे हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *