लोकेशन शोधताना काळाचा घाला
जोगेश्वरी: रात्रपाळीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करणाऱ्या एका १८ वर्षीय डिलिव्हरी बॉयचा भरधाव पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जोगेश्वरी पश्चिम येथे घडली. डिलिव्हरीचे ठिकाण शोधत असताना त्याच्या दुचाकीला मागून आलेल्या टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटेच्या सुमारास जोगेश्वरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील अजित ग्लास गार्डन परिसरात घडली. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर काम करणारा हर्ष बरनवाल हा युवक उशिरापर्यंत डिलिव्हरी करत होता. ग्राहकाचा पत्ता शोधत असताना भरधाव वेगाने आलेल्या पाण्याच्या टँकरने त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की युवक रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला.
स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रात्रपाळीत काम करणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, सतर्क नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी रणजीत यादव या चालकाला अटक करून त्याच्याविरुद्ध निष्काळजी व बेदरकार वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
मृत युवकाच्या कुटुंबीयांनी न्याय मिळावा, अशी मागणी करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. न्यायालयाने आरोपी चालकाला नंतर जामीन मंजूर केला असला तरी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या घटनेने मुंबईतील गिग इकॉनॉमीमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. रात्रीच्या वेळी कमी प्रकाश, वेगवान वाहतूक आणि वेळेच्या दडपणामुळे अशा कर्मचाऱ्यांना दररोज जीव धोक्यात घालून काम करावे लागत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
