Financial Fraud1

बनावट पोलिसाने प्रवाशाकडून १३ हजार रुपये उकळले

विलेपार्ले: बनावट पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार पुन्हा समोर येत आहेत. विलेपार्ले येथील एका ४३ वर्षीय नोकरदाराला बनावट पोलीस असल्याची बतावणी करून तब्बल १३ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याचा खोटा आरोप करत आरोपीने तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची भीती दाखवली आणि त्याच्याकडून रोख रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलेपार्ले परिसरातील रहिवासी मनोज पटेल (नाव बदललेले नाही) हे नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्याचवेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना अडवून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. आरोपीने खोटे ओळखपत्र दाखवत, “तुम्ही गुटखा खात आहात. महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल होईल आणि तीन महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो,” अशी धमकी दिली.

अचानक आलेल्या या धक्क्याने घाबरलेल्या मनोज यांना आरोपीने “प्रकरण जागेवरच मिटवायचे असेल तर दंड भरावा लागेल,” असे सांगितले. त्यानंतर त्यांना जवळच्या एटीएममध्ये नेऊन १३ हजार रुपये काढण्यास भाग पाडले. पैसे घेतल्यानंतर बनावट पोलीस तेथून पसार झाला.

घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर मनोज यांनी विलेपार्ले पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही व्यक्ती पोलीस असल्याचा दावा करत असेल, तर तिचे अधिकृत ओळखपत्र काळजीपूर्वक तपासावे. कोणत्याही कथित दंडाची रक्कम रोख स्वरूपात देऊ नये आणि संशय आल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे, असे टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *