विविध उद्योगक्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण
विरार : शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण करून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्साहाला आज यशाची नवी झळाळी मिळाली. विवा महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची हजेरी ही प्रमुख पाहुण्यांच्या रुपात लाभली.
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण पुष्पदीप मिश्रा ( सिनियर मॅनेजर, टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाईन) , केयुर घटालिया ( चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, बायोलॅब डायग्नोस्टिक लिमिटेड) , मुर्तुझा मोरबीवाला ( असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट, क्रिसिल) , सीए साईश नार्वेकर ( सिनियर फायनान्शिअल प्लॅनिंग, एससेंट मेडीटेक लिमिटेड), स्मित कवली ( संस्थापक, बायनरी कॉर्प टेक्नॉलॉजी ) , स्वराज मिश्रा ( सॉफ्टवेअर डेव्हलपर) साहना जनार्दन (असिस्टंट फायनान्स मॅनेजर क्नाईट फाईनटेक प्रायव्हेट लिमिटेड ) , महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, परिक्षा विभाग कार्यवाहक डॉ. राखी ओझा तसेच विविध विभागातील विभाग प्रमुख, समन्वयक यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रश्मी सावंत, डॉ. एलिना गोन्सालवीज यांनी केले.

पदवी प्रमाणपत्र हातात घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांच्या चेहऱ्यावरचा अभिमान यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून, समाज आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी आवश्यक असलेली मूल्ये, ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करण्याचे माध्यम असल्याचे मत उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले.
विवा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विविध सहशैक्षणिक उपक्रम, कौशल्यविकासाच्या संधी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या शैक्षणिक प्रवासाची फलश्रुती म्हणून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांनी आता आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग व्यावसायिक तसेच सामाजिक क्षेत्रात प्रभावीपणे करावा, अशी अपेक्षा यावेळी प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांनी व्यक्त करण्यात आली.
‘पदवी हा प्रवासाचा शेवट नसून, नव्या स्वप्नांच्या दिशेने सुरू होणारी नवी वाटचाल आहे,’ या भावनेने विद्यार्थ्यांनी पदवी स्वीकारावी आणि भविष्यात महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे असे मत महाविद्यालयाच्या उपप्रचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे यांनी व्यक्त केले तसेच विद्यार्थ्याना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
