150 feet flag at jogeshwari

खासदार रवींद्र वायकर यांची राज्य सरकारकडे मागणी

जोगेश्वरी: जोगेश्वरी पूर्व येथील ऐतिहासिक इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या परिसरात तब्बल १५० फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात यावा, अशी मागणी मुंबई उत्तर-पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

या संदर्भात वायकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवून प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानापासून प्रेरणा घेऊन हा उपक्रम सुचवण्यात आल्याचे वायकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

महाविद्यालयाच्या परिसरात मोकळ्या जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) माध्यमातून हा भव्य राष्ट्रध्वज उभारण्याचा प्रस्ताव आहे. महाविद्यालयातील सध्याचे ध्वजारोहणाचे ठिकाण उंच भागावर असल्याने १५० फूट उंच ध्वज उभारल्यास तो सुमारे एक किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसू शकतो, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास वायकर यांनी व्यक्त केला आहे.

प्रकल्पासाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देऊन प्रस्तावाला लवकर मंजुरी द्यावी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला सविस्तर प्रस्ताव तयार करून कामाला गती देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेण्याचा पर्याय वायकर यांनी सुचवला आहे. समिती किंवा अन्य सरकारी विभागांकडून निधी उपलब्ध न झाल्यास, खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी (MPLADS) मधून राष्ट्रध्वज उभारणीचा खर्च करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या प्रस्तावावर लवकर निर्णय घेऊन प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी अपेक्षा खासदार वायकर यांनी व्यक्त केली आहे.