rt deepostav

रोषणाई करण्यास आणि फटाके फोडण्यास आवर घालण्याचे केले आवाहन

मुंबई- महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना दीपोत्सव साजरा करणे मनाला पटत नाही, म्हणून यंदाचा दीपोत्सव रद्द करत असल्याची माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्हिडिओ द्वारे केली.

सोबतच त्यांनी या व्हिडिओ मध्ये विनंती केली आहे की, कंदील लावा, फराळ वाटा परंतु रोषणाई टाळा, फटाके फोडू नका. त्याचप्रमाणे पुढील वर्षी जल्लोषात दीपोत्सव साजरा करु असे देखील म्हटले आहे.

राज ठाकरे या व्हिडिओ मध्ये म्हणतात,

मनसेतर्फे दरवर्षी मुंबईत दीपोत्सव साजरा होतो, त्याचा प्रचंड उत्साह असतो, इथे शिवाजी पार्क मैदानामधे रोषणाई केलेली असते. फटाक्यांची आतषबाजी असते. ती आतषबाजी पाहण्यासाठी म्हणून मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोकं दीपोत्सव पाहण्यासाठी म्हणून आवर्जून इथे येतात आणि त्याचा आनंद लुटतात. सगळेजण इथे खूप मजा करत असतात. परंतु यावर्षीचा दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि याचं एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेला, आलेला आणि येऊ घातलेला हा जो भयानक दुष्काळ आहे.

मांडला संवेदनशील विचार

या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचा उत्सव साजरा व्हावा, असं मनाला काही पटलं नाही. आज महाराष्ट्र अत्यंत एका विचित्र अवस्थेमधून जात आहे. महाराष्ट्रामध्ये आज अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आज पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुष्काळ तर भयानक आहे आणि येणार आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जो या उत्साहामध्ये दिवाळी साजरी करतोय, ते पाहणं हे आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले आपले बांधव भगिनी… या भगिनींना काय वाटत असेल? त्यांच्या कच्च्या बच्च्यांना काय वाटत असेल? मला असं वाटतं या गोष्टींचा आपणच विचार केला पाहिजे.

काढले विरोधकांना चिमटे

हा सारासार विचार करता, कारण आत्ता मुख्यमंत्र्यांनी सांगितले की म्हणजे १९७२ पेक्षाही जास्त भयानक हा मोठा दुष्काळ असेल. आणि हे त्यांनी अगोदर जाहीर करून देखील मला असं वाटतं सत्ताधारी पक्षातल्या लोकांना बहुधा ते समजलं नाही आणि ते गरबा खेळत बसले. तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु इथे दिवाळी हा सण साजरा करत असताना अशा प्रकारचा दीपोत्सव साजरा करत असताना, मनाला ते काही पटत नाही आणि म्हणून यावर्षी हा निर्णय घेतला, की हा दीपोत्सव साजरा नाही करायचा.

व्यक्त केली अपेक्षा

पुढल्या वर्षी सगळं ठीकठाक होईल, व्यवस्थित होईल अशी आशा अपेक्षा आहे आणि ईश्वर चरणी प्रार्थना देखील आहे की सगळं नीट होऊ देत. आज महाराष्ट्रामधून असंख्य ठिकाणाहून तांडेच्या तांडे बाहेर पडतील आणि ते शहरांकडे येतील. शहराची परिस्थिती आता आपण बघतोच आहोत आणि अशा सगळ्या महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा उत्सव साजरा करणं हे काही मला पटलं नाही.

फटाके फोडताना, रोषणाई करताना आवर घालण्याची केली विनंती

माझी आपल्याला देखील नम्र विनंती आहे की काही आपल्याला काळी दिवाळी साजरी नाही करायची. परंतु त्या उत्साहाला कुठेतरी आपण आवर घालणं आवश्यक आहे. फटाके फोडताना, रोषणाई करताना कुठेतरी आपण आवर घालणं स्वतःलाच आवश्यक आहे. आपण सगळे महाराष्ट्राचे नागरिक आहोत. महाराष्ट्रावरती आपलं प्रचंड प्रेम आहे. सर्वांचंच प्रेम आहे आणि महाराष्ट्रामधला नागरिक अशा प्रकारे होरपळत असताना आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करायचा हे काही मला पटत नाही. आपल्यालाही नाही पटलं पाहिजे आणि म्हणून आपण या दिवाळीला आपण सर्वांनीच कंदील लावावेत, फराळ वाटावेत, सगळ्या गोष्टी कराव्यात परंतु रोषणाई करणं, फटाके फोडणे या गोष्टींना आवर घालावा एवढी फक्त मला आपल्याला विनंती करायची आहे. पुढल्या वर्षी पुन्हा एकदा आपण जोरात ही दिवाळी दीपोत्सव आपण साजरा करूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *