विरार : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्य केंद्र आणि शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शारदानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत करिअर संसद – करिअर कट्टाचे पाच दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बारामती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय करिअर मार्गदर्शन अधिवेशनात विरार येथील विवा महाविद्यालयाला उत्कृष्ट शैक्षणिक कार्य, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आणि करिअर मार्गदर्शनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स ‘ साठी सन्मानित करण्यात आले. सन्मान प्रमाणपत्र आणि १ लाख रुपये धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका ओमकारी पोतदार यांनी महाविद्यालयाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
या अधिवेशनात राज्यातील विविध महाविद्यालये, विद्यापीठे, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच करिअर मार्गदर्शक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना बाजार प्रक्रिया, ड्रोन प्रशिक्षण, मधुमक्षिका पालन आणि मत्स्यपालन याद्वारे व्यावहारिक शिक्षणाची ओळख करून देण्यात आली. “स्वयंसिद्धा” नावाचा एक विशेष सक्षमीकरण कार्यक्रम केवळ विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये स्वावलंबन आणि नेतृत्व यावर लक्ष केंद्रित केले गेले.
या आधिवेशनात विवा महाविद्यालयाचे ८ विद्यार्थी जे करिअर कट्टा करिअर संसदचे सदस्य आहेत ते देखील उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये चिंतन कळसकर (मुख्यमंत्री), क्रिश राजभर (नियोजन मंत्री), सिद्धी गावडे (सामान्य प्रशासन मंत्री), कृष्णा पांडे (माहिती व प्रसारण मंत्री), अमित मिश्रा (उद्योजकता विकास मंत्री), स्वाती सिंग (रोजगार विकास मंत्री), शुभम शॉ (सदस्य), आणि गौरव जनगीड (सदस्य) अश्या प्रकारे विद्यार्थ्यांनी मंत्री व त्यांच्या नेतृत्वाची भूमिका साकारून अधिवेशनची यशस्वी धुरा सांभाळली.
“हा गौरवशाली सन्मान म्हणजे विवा महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत सक्षम करिअर दिशा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू.” असे वक्तव्य प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांनी केले.
या मिळालेल्या यशाबद्दल विवा महाविद्यालयावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विरार परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात हा सन्मान अभिमानास्पद मानला जात आहे. या सन्मानामुळे विवा महाविद्यालयाची गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि करिअर मार्गदर्शनातील विश्वासार्हता अधिक दृढ झाली आहे.
महाविद्यालयाला मिळालेल्या सन्मानामुळे विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्रजी ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, संस्थेचे खजिनदार शिखर हितेंद्रजी ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, करिअर कट्टा पालघर जिल्हा सह समन्वयक डॉ. रोहन गवाणकर, आयक्यूएससी सह समन्वयक डॉ. अनुश्री किणी यांनी शुभेच्छा दिल्या.
