स्वस्त दरात USDT (Tether) क्रिप्टोकरन्सी मिळवून देण्याचे दाखवले आमिष
मुंबई : स्वस्त दरात USDT (Tether) क्रिप्टोकरन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेअर बाजाराशी संबंधित ४२ वर्षीय व्यावसायिकाची तब्बल ₹१९.७८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दुबईहून बाजारभावापेक्षा कमी किमतीत क्रिप्टोकरन्सी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत आरोपींनी विश्वास संपादन केला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, पंकज घनश्याम जगासिया (४२) हे चेंबूर येथील रहिवासी असून शेअर बाजाराशी संबंधित व्यवसाय करतात. त्यांना USDT खरेदी करायचे होते. त्याचदरम्यान संजय ऊर्फ मनोज तेजराज जैन (५३) याने त्यांच्याशी संपर्क साधला.
दुबईहून क्रिप्टोकरन्सी बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवून देऊ शकतो, असा दावा जैनने केला. या आकर्षक ऑफरमुळे जगासिया यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर या व्यवहारात निलेश दामोदर कथपाल (४१) यालाही सहभागी करून घेण्यात आले.
क्रिप्टोकरन्सी देण्याच्या आश्वासनावरून जगासिया यांनी आरोपींना एकूण ₹१९.७८ लाखांची रक्कम दिल्याचा आरोप आहे. मात्र, पैसे दिल्यानंतरही क्रिप्टोकरन्सी मिळाले नाही. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.
तक्रारीच्या आधारे अंधेरी पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपींचा माग काढला.
पोलिसांनी सापळा रचून २७ ऑगस्ट रोजी दोन्ही आरोपींना शोधून काढले. ते एका चहाच्या टपरीवर असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी दोघांना औपचारिकरीत्या अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून या व्यवहारामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू असल्याचे मिड डे च्या वृत्तांत म्हटले आहे.
टीप: सदर छायाचित्र एआय निर्मित आहे.
