मुंबई: विलेपार्ले(Vileparle) पूर्वेकडील एका अज्ञात व्यक्तीने बस स्टॉपवर आईच्या मांडीवरून दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण(Kidnap) करण्याचा प्रयत्न केला. मात्र आईच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्याचा डाव फसला. बाळाच्या कुटुंबियांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने अपहरणकर्त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

ही घटना ११ जानेवारी रोजी घडली. तक्रारदार, नवीना उपाध्याय (वय 25 वर्षे) एका हॉटेलमध्ये स्टुअर्ड म्हणून काम करते. ती तिच्या दोन वर्षीय मुलीसह पार्ले सबवे बस स्टॉपवर माहीमला जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. एक माणूस तिच्याकडे आला आणि तिच्याशी गप्पा मारत होता.

त्याने तिला जोगेश्वरीला(Jogeshwari) घेऊन जाण्याची ऑफर दिली. तसेच एकत्र नाश्ता करण्याविषयी विचारणा देखील केली. नविनाने नकार देऊन सुद्धा सदर इसम तिच्या मागावर होता. नवीना बेस्ट बस क्रमांक ४० मध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना, त्याने अचानक तिचा हात धरला आणि तिला जबरदस्तीने ओढले. नवीना ताबडतोब बसमधून उतरली, स्वतःची सुटका करून घेतली आणि तिच्या मुलीला घट्ट धरले.

तिने तिच्या पतीला घटनास्थळी बोलावले. अपहरण करणाऱ्या इसमाने खोटे सांगितले की ती मुलगी त्याची मुलगी आहे. दरम्यान स्थानिक रहिवासी जमले, त्यांनी सदर इसमास पकडले आणि पोलिसांच्या(Mumbai Police) ताब्यात दिले.