माजी कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक
अंधेरी : एका माजी कर्मचाऱ्याचा विश्वासघात, १० फूट छतावरून उडी मारणे आणि खारफुटीतून पाठलाग करणे – ही बॉलिवूडची कथा नव्हती तर अंधेरी (पश्चिम) (Andheri West)येथे ५०.१५ लाख रुपयांच्या घरफोडीचा उलगडा करणाऱ्या घटनांची साखळी होती. वर्सोवा (Versova) येथे अर्ध्या किलोमीटरच्या नाट्यमय पाठलागानंतर चार जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून पोलिसांनी ३१ लाख रुपये किमतीचे हिरे, सोन्याचे दागिने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत.
या गुन्ह्याचा मास्टरमाइंड हा २२ वर्षीय सूरज पवार आहे. सूरज श्वानपाल(Dog sitter) आहे. काही दिवसांपूर्वी सूरजला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. याचा राग त्याच्या मनात होता. तक्रारदार, ६५ वर्षीय जे.सी. रॉड्रिग्ज, एक विंटेज कार डीलर आहेत. ७ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी पॅलेस बुक करण्यासाठी त्यांच्या पत्नीसह जयपूरला निघाले होते. त्यांना माहित नव्हते की कोणीतरी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे.
१० फेब्रुवारी रोजी, रॉड्रिग्जचा कर्मचारी सुनील कांबळे रॉड्रिग्ज यांचा टीचर्स कॉलनीतील(Bandra) पहिल्या मजल्यावरील फ्लॅट उघण्यास गेला. मात्र दरवाजा आतून बंद होता. नंतर एका कुलूप दुरुस्त करणाऱ्याने दरवाजा उघडला. आतमध्ये अस्ताव्यस्त अवस्थेतील बेडरूम, कापलेल्या खिडकीचे ग्रिल आणि एक रिकामे कपाट तसेच होते. रॉड्रिग्ज आणि त्यांची पत्नी विमानाने मुंबईत पोहोचले. त्यावेळेस त्यांना ५०.१५ लाख रुपयांचे हिरे, सोन्याचे दागिने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरीला गेल्याचे आढळले. असे रॉड्रिग्ज यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.
पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. २२ वर्षीय सूरज पवार हा माजी श्वानपाल होता जो रॉड्रिग्जच्या फ्लॅटमध्ये सात महिने त्यांच्या पाळीव प्राण्याची काळजी घेत होता. नोकरीवरून काढून टाकल्यानंतर, पवारने सूड घेण्याचा कट रचला होता. त्याने त्याचा भाऊ जसवंत पवार (२२) आणि इतर दोघांना, सूर्या गौंडर (२२) जो फक्त १५ दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटला होता आणि त्याचा सहकारी मुदलियार (२२) यालाही सामील केले. “पवारने तुरुंगात त्याच्या भावाला भेटायला जाताना गौंडरशी मैत्री केली. त्याने गौंडरला २०% कमिशन देण्याचे आश्वासन दिले आणि रॉड्रिग्जच्या वेळापत्रकाची तपशीलवार नोंद ठेवली. रॉड्रिग्ज यांचा एक मुलगा परदेशात काम करतो आणि दुसरा नवी दिल्लीत राहतो हे आरोपींना माहित होते,” पोलिसांनी सांगितले.
पोलिसांना गौंडर वर्सोवा येथे लपला असल्याची माहिती मिळाली. अधिकारी घरात शिरले तेव्हा गौंडरने १० फूट छतावरून उडी मारली, खारफुटीतून पळत त्याने वर्सोवा जेट्टीकडे धाव घेतली. पण अर्धा किलोमीटर पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले.
“रॉड्रिग्जचे चोरीचे घड्याळ त्याच्या ताब्यात सापडल्यावर आम्ही त्याचा सहभाग असल्याचे सिद्ध केले,” असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले. मुदलियारच्या अटकेनंतर पोलिसांना गौंडर आणि शेवटी पवार बंधूंचा तपास घेणे सुलभ झाले. पोलिसांनी आतापर्यंत चोरीला गेलेल्या मौल्यवान वस्तूंपैकी ३१ लाख रुपये जप्त केले आहेत. अधिक तपास सुरू असल्याने चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, असे फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तात म्हटले आहे.

