Shikkamortab

मुंबई (महेश्वर भिकाजी तेटांबे): व्यावसायिक मराठी रंगभूमीवर सध्या एका नव्या कोऱ्या नाटकाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सलग पाच हाऊसफुल्ल प्रयोगांद्वारे प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवत, विनोदाची चौफेर टोलेबाजी करणारे ‘शिक्कामोर्तब’ हे नाटक सध्या नाट्यवर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.

‘तरंगिणी एंटरटेनमेंट’ आणि ‘नवनीत’ निर्मित तसेच प्रमोद शेलार लिखित व दिग्दर्शित या नाटकाने मनोरंजनासोबतच एका संवेदनशील विषयावर भाष्य करत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यास सुरुवात केली आहे. या नाटकाच्या निमित्ताने सागर कारंडे, भक्ती रत्नपारखी, कांचन पगारे आणि स्नेहा पराडकर ही कसलेली कलावंत मंडळी पहिल्यांदाच एकत्र आली असून, त्यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीने रंगमंचावर एक वेगळीच जादू निर्माण केली आहे.

whatsapp image 2026 06 22 at 14.05.10

एका जोडप्याच्या आयुष्यात अचानक दुसऱ्या जोडप्याची एन्ट्री होते आणि त्यानंतर उडणारा गोंधळ या नाटकातून अत्यंत खुमासदार विनोदी शैलीत मांडण्यात आला आहे. केवळ वरवरचा विनोद न मांडता, कोणत्याही नात्याला अधिकृतरीत्या ‘शिक्कामोर्तब’ करणे किती गरजेचे असते, याचा सखोल विचार करायला लावणारा संदेश दिग्दर्शक प्रमोद शेलार यांनी अतिशय रंजक पद्धतीने दिला आहे. हसवता हसवता प्रेक्षकांना अंतर्मुख करणारी ही कलाकृती आहे. नाटक ही कलाकाराच्या अभिनय क्षमतेची खरी कसोटी असते, आणि या कसोटीवर ‘शिक्कामोर्तब’ची संपूर्ण टीम १०० टक्के खरी उतरली आहे.

रंगभूमीशी नाळ जुळलेल्या सागर कारंडे या हरहुन्नरी कलावंताने आपले अभिनयाचे कसब पणाला लावून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. प्रत्येक संवादावर तो रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवतो. मंचावर येताच शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस पाडणारा कांचन पगारे यांचा ‘बंगाली मजनू’ हे या नाटकाचे प्रमुख आकर्षण आहे. मूळचा मराठी भाषिक असूनही बंगाली भाषेवर आणि लहेजावर त्याने मिळवलेले प्रभुत्व त्याच्यातील ‘अवलिया’ अभिनेत्याची प्रचिती देते. ‘लैला’ या अतिशय विनोदी आणि नटखट पात्रातून भक्ती रत्नपारखी यांनी नाटकाचा आशय लीलया प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. पण मजनू नामक कांचन पगारे यांच्या अलौकिक अभिनय केमिस्ट्रीमुळे लैला या व्यक्तिरेखेला आणि नाटकाला कमालीचे वजन प्राप्त झाले आहे. कमी वेळेतही आपल्या नैसर्गिक अभिनयाने स्नेहा पराडकर या कसलेल्या अभिनेत्रीने मंचावर आपली घट्ट पकड निर्माण केली आहे. रंगमंचावर तिचं सहजगत्या वावरणं…एका ‘वकिला’च्या भूमिकेत तिचे दिलखेचक संवाद आणि तिचा करारी बाणा यामुळे नाटकाची उंची अधिकच वाढत जाते.

तांत्रिक बाजूंची भक्कम साथ कलेवरील निष्ठा आणि प्रामाणिकपणा जपत उभे राहिलेले हे नाटक केवळ अभिनयातच नव्हे, तर तांत्रिक दृष्ट्याही अत्यंत सक्षम आहे. निर्मिती प्रमुख महेंद्र खराडे, संदेश बेंद्रे यांनी उभारलेले घर आणि शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना नाटकाच्या विषयाला एक सुंदर किनार देते, तर अभिजित पेंढारकर यांच्या संगीतामुळे नाटकाची रंगत द्विगुणित होते.

प्रसिद्धीच्या झोतापेक्षा कलेवरील अढळ निष्ठा जपणारे ‘शिक्कामोर्तब’ हे मराठी नाटक मराठी रंगभूमीला मिळालेली एक अनोखी मेजवानी आहे. वेगळ्या धाटणीचं आणि संवेदनशील टप्प्यावर नेऊन ठेवणारं हे नाटक प्रत्येकाने आवर्जून पाहावे असेच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *