Satish Rajwade

नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे. नुकताच या नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे रंगला होता. नाटक सुरू झाल्यानंतर काही ज्येष्ठ प्रेक्षक उशिरा नाट्यगृहात पोहोचले आणि त्यांच्या आसनव्यवस्थेमुळे प्रयोगात थोडासा व्यत्यय निर्माण झाला. मात्र यावेळी घडलेली एक गोष्ट उपस्थित रसिकांच्या कायम स्मरणात राहील अशी ठरली.

whatsapp image 2026 06 03 at 15.00.53(1)

नाटक रंगात आले होते. कथानकाने प्रेक्षकांची पकड घ्यायला सुरुवात केली होती. अशा वेळी उशिरा आलेल्या ज्येष्ठ प्रेक्षकांना जागा शोधण्यात अडचण येत असल्याचे लक्षात येताच अभिनेता-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी तात्काळ नाटक थांबवले. त्यांनी तंत्रज्ञांना सभागृहातील दिवे सुरू करण्यास सांगितले आणि सर्व ज्येष्ठ प्रेक्षक व्यवस्थित बसून स्थिरावत नाहीत तोपर्यंत प्रयोग पुढे सुरू केला नाही.

whatsapp image 2026 06 03 at 15.01.30

विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रसंगात त्यांनी कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही. उलट अत्यंत संयमाने आणि संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळली. प्रेक्षक आरामात बसल्यानंतरच त्यांनी पुन्हा नाटकाला सुरुवात केली.

या घटनेचा प्रभाव इतकाच मर्यादित राहिला नाही. मध्यंतरानंतर दुसरा अंक सुरू करण्यापूर्वीही सतीश राजवाडे स्वतः रंगमंचावर आले आणि हसत-हसत, “सगळे प्रेक्षक जागेवर बसले आहेत ना? नाटक सुरू करूया का?” अशी विचारणा केली. त्यानंतरच दुसऱ्या अंकाचा पडदा उघडला.

whatsapp image 2026 06 03 at 15.01.31

रंगभूमीवर उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शनासाठी ओळखले जाणारे सतीश राजवाडे यांचा हा संवेदनशील आणि सौजन्यशील पैलू पाहून उपस्थित रसिक भारावून गेले. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील नातं केवळ टाळ्यांपुरता नसून परस्पर आदर आणि जिव्हाळ्यावरही उभं असतं, याची सुंदर जाणीव या प्रसंगाने करून दिली.

कधी कधी एखाद्या कलाकाराचा मोठेपणा त्याच्या भूमिकांमधून नाही, तर रंगमंचावर घडलेल्या अशा छोट्याशा कृतीतून दिसून येतो. आणि या प्रयोगादरम्यान सतीश राजवाडेंनी नेमकं तेच सिद्ध केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *