जागतिक पर्यावरण दिनाचे World Environment Day औचित्य साधत आगामी मराठी चित्रपट ‘आऊट ऑफ सिलॅबस’ Out of Syllabusच्या टीमने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. चित्रपटातील कलाकार, निर्माते आणि संपूर्ण टीमने उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी टीमने विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि वृक्षतोड यांसारख्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
वृक्षारोपणासोबतच ‘आऊट ऑफ सिलॅबस’ चित्रपटाचे अनोख्या पद्धतीने प्रमोशनही करण्यात आले. पर्यावरणपूरक उपक्रमातून चित्रपटाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न टीमकडून करण्यात आला.
यावेळी चित्रपटाचे निर्माते डॉ. सुगत जी वाघमारे, लेखक अनिकेत रामचंद्र कोरडे, AI क्रिएटिव्ह डायरेक्टर सचिन मनोहरराव ढोकणे आणि अभिनेता अजिंक्य राऊत, अद्वयी, शेषपाल गनवीर, अभिजीत रामचंद्र ही कलाकारांची टीम उपस्थित होती. मॅक्सिस सिटी नवी मुंबई येथे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
सामाजिक जाणीव आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. ‘आऊट ऑफ सिलॅबस’ हा चित्रपट तरुणाई, शिक्षण आणि सामाजिक भान या विषयांवर भाष्य करणारा असून, प्रेक्षकांना एक वेगळा आणि प्रेरणादायी अनुभव देणार आहे.
चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
