swapnasundari

भूषण प्रधान-सायली पाटीलची अनोखी केमिस्ट्री

प्रेमाच्या नाजूक भावना, मनात अलगद उमलणारी ओढ आणि एका नव्या नात्याची गोड सुरुवात यांचं सुंदर चित्रण करणाऱ्या ‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटातील ‘जादू केलीस तू’ हे रोमँटिक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात भूषण प्रधान आणि सायली पाटील यांची फ्रेश आणि आकर्षक जोडी पाहायला मिळत असून, त्यांच्या सहजसुंदर केमिस्ट्रीने गाण्याला रंगत आली आहे. मनाला भिडणाऱ्या दृश्यांसोबतच गाण्याचे सुरेल संगीत आणि भावस्पर्शी शब्द प्रेक्षकांना प्रेमाच्या दुनियेत घेऊन जातात. या चित्रपटातील गाण्यांची खासियत म्हणजे ही गाणी बुडापेस्ट येथे रेकॉर्ड करण्यात आली आहेत.

या गाण्याला इंडियन आयडॉल विजेता अभिजीत सावंत आणि मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय गायिका आर्या आंबेकर यांचा मधूर आवाज लाभला आहे. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या या गाण्याला अंकुश बोराडकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. गाण्यातील प्रत्येक ओळ प्रेमातील कोमल भावना व्यक्त करते. तसेच अभिजीत आणि आर्या यांच्या आवाजातील भावनांनी त्याला आणखी उंची प्राप्त करून दिली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणतात, “‘जादू केलीस तू’ हे गाणं चित्रपटातील दोन व्यक्तींच्या नात्याचा भावनिक प्रवास आहे. भूषण आणि सायली यांनी त्या भावना अतिशय सुंदरपणे पडद्यावर साकारल्या आहेत. प्रेक्षकांना हे गाणं पाहाताना त्यांच्या स्वतःच्या प्रेमकथेची आठवण नक्की येईल.”

गाण्याबद्दल अभिजीत सावंत आणि आर्या आंबेकर म्हणतात, “‘जादू केलीस तू’ हे एक अतिशय नाजूक आणि मनाला स्पर्श करणारे प्रेमगीत आहे. गाण्यातील भावना, त्याची सुरेल चाल आणि शब्दांची सहजता यामुळे हे गाणं गाताना एक वेगळाच आनंद मिळाला. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते जी, नकळत आपल्या जगात जादू करून जाते. हे गाणं त्याच भावनेचं सुंदर प्रतिबिंब आहे. प्रेक्षकांना हे गाणं नक्की आवडेल.”

सतीश महादेव गेजगे निर्मित आणि अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित ‘स्वप्नसुंदरी’ हा लग्नसंस्था, नात्यांमधील गुंतागुंत आणि आयुष्यातील योग्य जोडीदाराच्या शोधावर आधारित एक मनोरंजक कौटुंबिक चित्रपट आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची धुरा अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी सांभाळली असून, दर्शना सतीश गेजगे आणि निलेश सुरेश अग्रवाल हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. येत्या २४ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *