“सर, आजचा तास खूप छान झाला, तुमच्यामुळे हा विषय समजला.”
विद्यार्थ्याच्या तोंडून सहज निघालेलं हे एक वाक्य प्राध्यापकासाठी मोठं पारितोषिक असतं. महिन्याचा पगार, पुरस्कार किंवा सन्मानपत्र यापेक्षाही विद्यार्थ्याच्या डोळ्यात दिसणारा विश्वास अधिक मोलाचा वाटतो. कारण प्राध्यापक हा केवळ विषय शिकवत नाही; तो विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देत असतो, आत्मविश्वास जागवत असतो आणि अनेकदा त्यांच्या आयुष्याला नवं वळण देत असतो.
वर्गात उभा असलेला प्राध्यापक विद्यार्थ्यांना नेहमी आत्मविश्वासपूर्ण, अभ्यासू आणि शांत दिसतो. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती चिंता, किती संघर्ष आणि किती अनिश्चितता दडलेली असते, हे फार कमी लोकांना माहीत असते. विद्यार्थ्यांना शिकवताना तो स्वतःच्या समस्या कधीच वर्गात आणत नाही. कारण त्याला माहिती असते की विद्यार्थ्यांनी त्याच्याकडून ज्ञान घ्यायचे आहे, त्याच्या अडचणी नव्हे.
समाजात डॉक्टर घडतात, अभियंते घडतात, प्रशासकीय अधिकारी घडतात, पत्रकार, वकील, शास्त्रज्ञ आणि उद्योजक घडतात. पण या प्रत्येकाच्या यशाच्या प्रवासात एखादा शिक्षक आणि एखादा प्राध्यापक नक्कीच असतो. उच्च शिक्षणाच्या स्तरावर विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील धडे शिकवणे हे प्राध्यापकाचे काम नसते. संशोधनाची आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला शिकवणे, त्यांच्यात चिकित्सक विचारसरणी विकसित करणे, समाजाकडे जबाबदारीने पाहण्याची दृष्टी देणे आणि ज्ञानाचा योग्य उपयोग कसा करायचा हे शिकवणे, ही त्याची खरी भूमिका असते.
आजच्या काळात ही भूमिका अधिक आव्हानात्मक झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, मूल्यमापन आणि कौशल्याधारित शिक्षण यामध्ये सातत्याने बदल होत आहेत. या बदलांशी जुळवून घेण्यासाठी प्राध्यापकांना सतत शिकावे लागते. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागते. संशोधनपत्रे लिहावी लागतात, कार्यशाळांमध्ये सहभागी व्हावे लागते, विद्यार्थ्यांना प्रकल्पांमध्ये मार्गदर्शन करावे लागते आणि त्याच वेळी स्वतःची शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवावी लागते. म्हणजेच प्राध्यापक शिकवण्यापेक्षा जास्त वेळ स्वतः शिकण्यात घालवत असतो.
मात्र या सर्व प्रयत्नांनंतरही अनेक तरुण प्राध्यापकांचे वास्तव वेगळे आहे. नेट, सेट आणि पीएच.डी.सारख्या कठीण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक वर्षे आयुष्य खर्ची होतात. संशोधनासाठी दिवस-रात्र मेहनत घ्यावी लागते. घरच्यांच्या अपेक्षा, आर्थिक मर्यादा आणि स्वतःची स्वप्ने यांच्यात समतोल साधत अनेक जण या प्रवासातून पुढे येतात. पण जेव्हा कायमस्वरूपी नोकरीची वेळ येते, तेव्हा अनेकांना अनएडेड विभाग किंवा सीएचबी (क्लॉक हार बेसेस) तत्त्वावर काम करण्याची वेळ येते.
सीएचबी म्हणजे प्रत्येक तासाच्या मोबदल्यावर काम. तास घेतले तर मानधन, नाहीतर उत्पन्न नाही. शैक्षणिक वर्ष संपले की पुन्हा पुढील वर्षी संधी मिळेल की नाही, याची खात्री नसते. अनेकदा एका दिवसात दोन-तीन महाविद्यालयांमध्ये प्रवास करून अध्यापन करावे लागते. हातात पुस्तकांची बॅग असते, चेहऱ्यावर हसू असते; पण मनात उद्याची चिंता असते. तरीही विद्यार्थ्यांसमोर उभे राहताना त्या चिंतेचा एकही शब्द ओठांवर येत नाही.
समाजाला अनेकदा “प्रोफेसर” हा शब्द ऐकला की स्थिर नोकरी, चांगला पगार आणि आरामदायी जीवन अशी प्रतिमा दिसते. पण वास्तव प्रत्येकासाठी सारखे नसते. अनेक गुणवंत प्राध्यापक आपल्या ज्ञानाचा आणि कष्टाचा पूर्ण उपयोग करूनही आर्थिक आणि व्यावसायिक स्थैर्याच्या प्रतीक्षेत असतात. त्यामुळे काहींना अतिरिक्त शिकवण्या घ्याव्या लागतात, संशोधन, लेखन, कार्यशाळा किंवा इतर शैक्षणिक कामांमधून उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधावे लागतात. ही त्यांची कमजोरी नसते; ती परिस्थितीशी लढण्याची त्यांची जिद्द असते.
प्राध्यापक हा फक्त शिकवणारा माणूस नसतो. तो अनेक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असतो, समुपदेशक असतो आणि काही वेळा पालकांची भूमिकाही निभावत असतो. एखादा विद्यार्थी नैराश्यात असेल, करिअरबद्दल संभ्रमात असेल किंवा वैयक्तिक अडचणीत असेल, तर त्याला धीर देणारा पहिला माणूस अनेकदा त्याचा प्राध्यापकच असतो. ही जबाबदारी कोणत्याही अभ्यासक्रमात लिहिलेली नसते, पण प्रत्येक संवेदनशील प्राध्यापक ती मनापासून स्वीकारत असतो.
म्हणूनच या विषयाकडे केवळ सहानुभूतीने पाहण्याची गरज नाही, तर संवेदनशीलतेने आणि वास्तव समजून घेण्याच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण शिक्षणव्यवस्थेची गुणवत्ता ही केवळ आधुनिक इमारती, डिजिटल वर्गखोल्या किंवा नवीन अभ्यासक्रमांवर ठरत नाही. ती वर्गात उभ्या असलेल्या प्राध्यापकाच्या ज्ञानावर, निष्ठेवर, मानसिक समाधानावर आणि व्यावसायिक स्थैर्यावरही तितकीच अवलंबून असते. स्थिर, प्रेरित आणि संशोधनाभिमुख प्राध्यापक म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सर्वात मजबूत पायाभरणी.
प्राध्यापक होणे म्हणजे केवळ नोकरी मिळवणे नव्हे. ती एक आयुष्यभराची साधना आहे. रोज काहीतरी नवीन शिकण्याची, स्वतःला सतत घडवत राहण्याची आणि त्याच वेळी शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामध्ये स्वतःचा आनंद शोधणारा हा माणूस समाजाच्या प्रगतीसाठी शांतपणे काम करत राहतो. त्याच्या संघर्षाला कदाचित मोठ्या मथळ्यांमध्ये स्थान मिळत नसेल, पण त्याच्या योगदानामुळे असंख्य आयुष्यांना दिशा मिळत असते.
पदवी मिळवणे कठीण असते. पीएच.डी. पूर्ण करणे त्याहून कठीण असते. पण त्या सर्व पात्रतेला न्याय देत, स्वतःच्या संघर्षाला बाजूला ठेवून दररोज नव्या उत्साहाने वर्गात उभे राहणे, विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत स्वप्ने जागवणे आणि समाजासाठी सक्षम पिढी घडवत राहणे – हे सर्वांत कठीण असते.
म्हणूनच शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते—
प्राध्यापक हा पेशा केवळ व्यवसाय नाही; तो समाज घडवण्याचा संकल्प आहे. आणि म्हणूनच.
“प्रोफेसर” होणं खरंच सोपं नाही बरं…!
- शुभम रेखा शंकर पेडामकर
