निर्भीड लेखणीचा आणि निस्वार्थ सेवेचा सन्मान
मुंबई: ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या वतीने पहिला ‘पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य आणि समाजसेवक पुरस्कार सोहळा’ नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला. दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. “महाराष्ट्रातील तळागाळातील लेखणीला सलाम” हा उदात्त हेतू उराशी बाळगून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’चे सर्वेसर्वा आणि या सोहळ्याचे मुख्य आयोजक महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेत मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. सूर्यभान डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले.
जगप्रसिद्ध बोलके बाहुलाकार श्रीधर कीर, ‘कुटुंब रंगलंय काव्यात’चे सादरकर्ते प्रा. विसुभाऊ बापट, प्रसिद्ध कवी व साहित्यिक अरुण म्हात्रे, साहित्याचार्य पंढरीनाथ तामोरे, ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपणकर, ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक प्रभाकर तोडणकर, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते कांचन पगारे, अभिनेते, निर्माते दिलीप कांबळे, समाजसेवक अॅड. सुनिल भार्गवराम शिर्के, वैभव सुरेश कदम, ‘स्पेस रिअलटर्स’चे अतुल तोडकरी, कृष्णा काजरोळकर आणि अभिनेते अॅड. गौरव जयवंत पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या गुणवंतांना त्यांच्या अलौकिक कार्याबद्दल ‘स्वाभिमान लेखणी’, ‘शब्दवेध गौरव’, ‘अजेय लेखणी’, ‘कलम-रत्न’, ‘साहित्य-संस्कृती जीवनगौरव’, ‘विवेक-दीप’, ‘कलागौरव’, ‘जनसेवा रक्षक’, आणि ‘निर्भीड पत्रकारिता’ यांसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

“गावागावांतील पत्रकारांचा सन्मान हे जिकिरीचे काम” असे म्हणत ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी आयोजकांचे कौतुक केले. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील गावागावांत विखुरलेल्या पत्रकारांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करणे ही अत्यंत जिकिरीची बाब आहे, जी महेश्वर तेटांबे यांनी यशस्वीपणे साध्य करून दाखवली आहे.” प्रा. विसुभाऊ बापट यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाला सदिच्छा दिल्या. जगद्विख्यात बोलके बाहुलाकार श्रीधर कीर यांनी महेश्वर तेटांबे यांच्या धाडसी वृत्तीचे कौतुक करताना सांगितले की, “हा पुरस्कार सोहळा वाखाणण्याजोगा असून, तो प्रत्येक पुरस्कारार्थीला समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची नवी प्रेरणा देईल.” ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपणकर यांनी आयोजनातील शिस्तप्रियतेचे कौतुक करत तेटांबे यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अभिनेत्री लक्ष्मी गुप्ता, प्रियांका फणसोपकर, अभिनेता व दिग्दर्शक अविनाश घाडी, निलेश घाडी, निखिल कटारे, पत्रकार राहुल खरात, रघुनाथ ढोक, केतन भोज, छायाचित्रकार नरेंद्र भोसले आणि राहुल शिंदे यांचे विशेष योगदान आणि सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी अभिनेते अविनाश राऊत यांनी सर्वांचे आभार मानले. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी गायलेल्या राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.
